नव्या डीपीसाठी विद्युत महावितरणकडे पाठपुरावा करण्याचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन
एकाच डीपीवर अनेक वसाहतीचा भार -मनोज कराळे
नगर (प्रतिनिधी)- केडगावमधील प्रभाग क्र. 16 अंतर्गत येणाऱ्या रभाजी नगर, वैष्णव नगर, भूषण नगर आणि आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अधिक क्षमतेची नवीन डीपी उभारण्याची मागणी नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भीमाशंकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज कराळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी नुकतीच आमदार जगताप यांची भेट घेऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा प्रश्न मांडण्यात आला. यावेळी शारदा राठोड, सुवर्णा वाघ, राजश्री साळवे, मंजू निमसे, संतोष राठोड, प्रकाश चोथे, संध्या अंधारे आदी उपस्थित होते.
रभाजी नगर येथील जुन्या डीपीद्वारे वैष्णव नगर, भूषण नगर आदी भागांना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु गेल्या काही वर्षांत या भागात लोकसंख्या आणि घरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, वीज कनेक्शनची संख्या वाढूनही डीपी मात्र जुन्याच क्षमतेची आहे. या वाढलेल्या भारामुळे वारंवार ट्रिपिंग व वीज खंडनाचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याचे मनोज कराळे यांनी म्हंटले आहे.
सद्यस्थितीत ही डीपी अपुरी पडत असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांचे रोजचे दैनंदिन काम, विद्यार्थ्यांचे अभ्यास, घरगुती काम करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे. काहीवेळा तर दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी, नागरिकांमध्ये संताप वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करुन संबंधित विभागाला नवीन व अधिक क्षमतेची डीपी लवकरात लवकर उभारण्याच्या सूचना देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.