कार्यालयातून नव्हे तर, एजंटकडून मिळते योग्य माहिती व मार्गदर्शन
कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी की, दिशाभूल करण्यासाठी?
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे असलेल्या पुरवठा विभागाच्या अन्न-धान्य वितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेशनकार्ड त्यासंबंधी काही विचारणा केल्यास उडवा-उडवीची उत्तरे देऊन नागरिकांना घरचा रस्ता दाखविला जात आहे. हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी आहे का? दिशाभूल करण्यासाठी? याचा उलगडा होत नसून, नागरिक मात्र येथील कामे एजंटाशिवाय होत नसल्याच्या प्रतिक्रिया आलेल्या अनुभवाने देत आहेत.
रेशनकार्ड संबंधी असलेल्या विविध त्रुटी व माहिती तसेच एखाद्या कामानिमित्त गेल्यास संबंधित यंत्रणेकडून योग्य माहिती दिली जात नाही. मात्र बाहेरील एजंटकडून योग्य व उपयुक्त माहिती मिळत आहे. अन्न-धान्य मिळत नसल्याने रेशनकार्ड बारा अंकी करण्याची विचारणा केल्यास महिनाभरानंतर या! ऑनलाइन बंद असल्याचे उत्तरे देऊन नागरिकांना घरचा रस्ता दाखविला जात आहे. नागरिक निराश होऊन घरी परतत आहे.
मात्र एजंट व येथील झेरॉक्स दुकानात विचारणा केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अन्वये अन्न-धान्याचे लाभ मिळण्याचे फॉर्म घेऊन कागदपत्र जोडून रेशनकार्ड बारा अंकी करण्यासाठी रेशन दुकानदारांकडे जमा करण्याचे सांगण्यात आले. या संबंधी पुरवठा विभागातील त्या महिलेला विचारणा केली असता, ते फॉर्म विकत आहे त्यांचा आमचा संबंध नसल्याचे अजब उत्तर देण्यात आले. नागरिक देखील या वागणुकीने संभ्रमात पडत आहे. नागरिकांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळाल्यास नागरिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. मात्र नेहमीच पुरवठा विभागाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अशा पध्दतीने वाईट वागणुक देऊन त्यांची गैरसोय केली जात आहे.