10 वर्षांपासून रस्ता, पाणी व ड्रेनेज समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष
कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन, निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील 10 वर्षांपासून केडगाव देवी रोड परिसरातील अथर्व नगर, ठुबे मळा येथील नागरिकांना रस्ता, पाणी व ड्रेनेज या मूलभूत नागरी सुविधांचा तुटवडा भासत आहे. अनेक निवेदने देऊनही समस्या कायम असल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी (दि. 30 सप्टेंबर) महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना भेटून तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन दिले.
महापालिकेचे कर नियमित भरूनही नागरिकांना सुविधा नाकारल्या जात असल्याने संतप्त नागरिकांनी आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रश्न न सुटल्यास सर्व नागरिक महापालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी दिलीप दुधवणे, अविका पुंडे, मकरंद जोशी, विठ्ठल गारुडकर, शेषराव तांबडे, सोनवणे, मेजर सुरेश आंधळे, सतीश सूर्यवंशी, नितीन घोडके, तेजस बिचकर, भुजबळ मामा, समीर कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, ओंकार तागडे, ऋग्वेद दंडवते, दिलीप भोसले, संदीप मराठे, ताराचंद केवट, बाजीराम गर्जे, अनिकेत साळी, विजय बडवे तसेच मंजुषा पाठक, मनिषा तांबोळी, सोनाली कुलकर्णी, अबोली जोशी, वैशाली पुंडे, घोडके, दूधवणे, उषा तांबडे, गर्जे, पद्मा तांबे, प्रिती दंडवते, प्रमिला कानफाडे, कविता बिचकर, भागडे, रेखा पावसे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अथर्व नगर वसाहतीची स्थापना 2009-2010 साली झाली असून सध्या येथे दीडशे ते दोनशे कुटुंब राहतात. परंतु, वसाहतीत ना व्यवस्थित रस्ता, ना ड्रेनेज लाईन आणि ना योग्य पाणीपुरवठा असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
या भागात ड्रेनेज लाईन नसल्यामुळे घरांचे सांडपाणी व पावसाचे पाणी साचून डबके तयार होत आहेत. या ठिकाणी डास, दुर्गंधी व अस्वच्छता वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पर्यायी निचऱ्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने परिसरात दूषित वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पाणीपुरवठ्यासाठी दोन ते अडीच इंची जुनी लाईन वापरली जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी कमी दाबाने मिळते. वसाहतीत वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता पाणीपुरवठा अपुरा पडतोय. त्यामुळे नागरिकांनी 4 इंची नवी लाईन तातडीने टाकून देण्याची मागणी केली आहे. या भागातील रस्ता दोन वेळा मंजूर झाला असूनदेखील स्थानिक दोन व्यक्तींच्या वादामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे नागरिकांना दररोज चिखल, खड्यांनी भरलेल्या व धुळीच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.