समर्पण सेवा संस्थेतील महिलांचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न
शिक्षणातून जीवन प्रकाशमय होणार -रूपा पंजाबी
नगर (प्रतिनिधी)- समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक भान ठेवून कार्यरत असलेल्या समर्पण सेवा संस्थेच्या महिलांनी चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्ट संचलित बालगृहातील विद्यार्थ्यांना अन्न-धान्य व किराणा साहित्याची भेट दिली. या उपक्रमाअंतर्गत मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे मनोरंजनात्मक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
समर्पण सेवा संस्थेच्या महिलांनी बालगृहातील मुलांसोबत वेळ घालवत त्यांच्यासह कार्यक्रमाचा आनंद लुटला. चिमुकल्यांसाठी हा कार्यक्रम एक आनंदाची पर्वणी ठरली. शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप, मार्गदर्शन सत्रे, तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या अध्यक्षा रूपा पंजाबी, सुनिता साहनी, शशी आनंद, सुमन साहनी, कोमल साहनी, वर्षा तलवार, हेमा बस्सी, वसंतकौर वधवा, मंजू अरोरा, संगीता जग्गी, रेखा पावा, किरण खोसला, पुनम खुल्लर, राजेंद्र जग्गी, भाग्यरेखा, सोनिया कुंद्रा आदी सदस्य उपस्थित होते.
रूपा पंजाबी म्हणाल्या की, जीवनात यश प्राप्त करण्यासाठी कोणावरही विसंबून राहू नये. जीवनात आपले अस्तित्व निर्माण करावे. शिक्षण घेऊन मोठे व्हावे. तर स्वतः यशस्वी झाल्यावर इतरांना देखील मदतीचा हात देऊन, इतरांचे जीवन प्रकाशमय करण्याचे त्यांनी सांगितले. तर उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य करुन प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बालगृहाचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी महिलांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तर बालगृहाच्या अधीक्षिका पुष्पांजली थोरात यांनी समर्पण सेवा संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.