• Sun. Feb 15th, 2026

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी

ByMirror

Aug 13, 2025

गोकुळाष्टमी निमित्त रंगला बहारदार सांस्कृतिक सोहळा


श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषेतील लहानग्यांनी वेधले उपस्थितांचे लक्ष

नगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमीच्या निमित्ताने जल्लोषमय वातावरणात दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा करण्यात आला. राधा व श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजलेल्या बालकांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गवळणी आणि कृष्णजन्माच्या गीतांनी कार्यक्रमाला भक्तीमय रंगत आणली.


दहीहंडी फुटताच हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लाल की… या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दणाणून गेला. लहानग्या गोविंदांच्या उत्साहात संपूर्ण विद्यार्थीवर्ग सामील झाला. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाळेच्या अंगणात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या, तसेच फुलं आणि फुग्यांनी सजावट करण्यात आली होती. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी लंके व सौ.लक्ष्मीताई आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगला होता. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकच्या शिक्षिका मिनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, सोनाली अनभुले, रुपाली वाबळे, इंदूमती दरेकर, पुनम घाडगे, भाग्यश्री लोंढे, भारती सुसरे, कांचन मदने, विद्या बडवे आदींसह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. हिंदी-मराठी गाण्यांवर नृत्य व नाट्यरूप सादरीकरणाने या कार्यक्रमात रंगत आणली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात लहानग्यांच्या कलागुणांना दाद दिली. मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी दहीहंडी हे एकतेचे प्रतीक आहे. अशा सण-उत्सवातून विविधतेने नटलेल्या एकात्म भारताचे दर्शन घडते आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीसह एकात्मतेची भावना वाढीस लागत असल्याचे स्पष्ट केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *