• Mon. Nov 3rd, 2025

चिचोंडी पाटीलला ताबामारी विरोधात सूर्यसाक्षी काळीआई ताबा पडताळणी घोषित

ByMirror

Jun 16, 2024

ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जमिनीचा ताबा होणार सिध्द

राजकीय सत्तापेंढारी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांशी संगणमत करून शेत जमीनीवर ताबा मारत असल्याचा आरोप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे मुळ शेतकऱ्याच्या ताब्यात असलेल्या शेत जमिनीवरील ताबामारी थांबवण्यासाठी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने सूर्यसाक्षी काळीआई ताबा पडताळणी घोषित करण्यात आले आहे. 23 जून रोजी दुपारी 1 वाजता गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ताबा पडताळणी केली जाणार आहे.


चिचोंडी पाटील येथील गट नंबर 322 मधील 1 हेक्टर 83 आर जमिन हरिदास माधव खराडे, पमाबाई माधव खराडे, इंदुबाई सुरेश हजारे यांच्या ताब्यात आहे. मात्र गावातील काही राजकीय सत्तापेंढारी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांशी संगणमत करून स्वतःच्या नावावर जमिनी खरेदी करून आपल्या गुंडांचा वापर ताबा घेण्यासाठी करत आहे. त्यातून या भागात शेतजमीनीवर ताबामारी सुरू झाली आहे.


ताबामारीसाठी सुरु असलेली दहशत संपवून सर्वांच्या साक्षीने अनेक वर्षापासून असलेला जागेचा ताबा कोणाकडे असल्याचे सिध्द केले जाणार आहे. ताबामारी रोखण्यासाठी केले जाणारे सूर्यसाक्षी काळीआई ताबा पडताळणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांना पाठविण्यात आले आहे. चिचोंडी पाटील परिसरामध्ये राजकीय सत्तापेंढारी व भ्रष्ट नोकरशाही एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात ताबामारीचा सपाटा सुरू ठेवला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


सदर जमीनीवर ताबा असलेल्या शेतकऱ्यांनी मशागत करून पेरणी सुरू केलेली आहे. परंतु वडिलोपार्जित 60 ते 70 वर्षे त्यांच्या कुटुंबाकडे असलेली ही जमीन अडाणीपणाने रेकॉर्ड ऑफ राईटला त्यांचे नावाची नोंद केली नाही. याचा गैरफायदा घेऊन राजकीय सत्तापेंढारी व भ्रष्ट अधिकारी ही जमीन खरेदी करण्याच्या तयारीला लागून, जमिनीची ताबामारी करण्यासाठी जमवाजमाव करत आहेत. त्यामुळे जमिनीचा ताबा स्पष्ट करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


सर्वोच्च न्यायालयाने रामेगौडा प्रकरणात निवाडा देऊन असे स्पष्ट केले आहे की, शेतजमीन किंवा जागेचा ताबा कोणालाही दंडेली करून घेता येणार नाही. शेतकऱ्यांची जमीन ताबामारी करणाऱ्यांकडून वाचविण्यासाठी हे आंदोलन जारी करण्यात आले असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *