शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन केली स्वच्छता
सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ
अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथे नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माय भारत उपक्रमाच्या स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत श्री नृसिंह विद्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगून शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. तर विद्यार्थ्यांना घाण करणार नाही, इतरांनाही घाण करू न देता सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ देण्यात आली.
या अभियानाप्रसंगी श्री नृसिंह विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, आदम शेख, बाबासाहेब घुंगार्डे, आशिष आचारी, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, विजय देवकर, दादासाहेब हजारे, महेश मुळे, अनिल पंडित, प्रतिभा डोंगरे, प्रतिभा जगताप, कल्पना ठुबे, आशंका मुळे, पुष्पवर्षा भिंगारे, भाग्यश्री वेताळ, प्रिया जाधव, हेमा मोढवे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व ग्रामस्थांनी लक्षात घेण्याची गरज आहे. साथीचे आजार पसरल्यानंतर स्वच्छता करण्यापेक्षा हे आजार रोखण्यासाठी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक स्वच्छता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून, नागरिकांचे देखील कर्तव्य आहे. युवकांसह नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेला चळवळीचे स्वरुप दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगून सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे सांगितले. तर स्वच्छता ही फक्त कार्यक्रमापुरती मर्यादीत न ठेवता सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य चळवळीला चालना देण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.
