लेझीम, झांज व ढोल पथकाच्या निनादात कर्मवीरांना अभिवादन
शाहू, फुले, आंबेडकरांचे वारसदार म्हणून माणुसकी हा एकमेव धर्म मानून वाटचाल करा -सुधीर लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लेझीम, झांज व ढोल पथकाच्या निनादात कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी शाळेत वडाच्या झाडाखाली असलेल्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शासनाच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांच्या प्रमुख उपस्थिती व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, अनिल साळुंखे, स्कूल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर, विश्वासराव काळे, ज्ञानदेव म्हस्के, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुधीर लंके म्हणाले की, आज एकवीसाव्या शतकातही शिक्षण क्षेत्रातील अनेक अडचणी आहेत. मात्र पूर्वी कोणत्याही सोयी-सुविधा नसताना कर्मवीर अण्णांनी शैक्षणिक चळवळ उभी केली. शिक्षणाने बहुजन समाज सावरला. कर्मवीर अण्णांवर छत्रपती शाहू महाराजांचा प्रभाव होता. त्यांचे विचार आपल्या कार्यातून कर्मवीरांनी पुढे नेले. समाजात शाहू, फुले, आंबेडकरांचे वारसदार म्हणून जातपात, धर्म भेदभाव न मानता माणुसकी हा एकमेव धर्म मानून वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचारांचा त्यांनी उलगडा केला. कर्मवीर अण्णांनी सर्व जात, धर्म पंथाच्या लोकांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. आजच्या युगात रयत शिक्षण संस्था ही एक आदर्श ब्रॅण्ड निर्माण झाला आहे. माणूस घडविणाऱ्या रयत शिक्षण संस्थेत शिकलो, हा प्रत्येक विद्यार्थ्याला अभिमान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, दूरदृष्टी ठेऊन कर्मवीरांनी बहुजन समाजाला शिक्षण देऊन विकासाच्या प्रवाहात आनले. कर्मवीरांनी कमवा व शिकाचा दिलेला संदेश युवकांना आजही प्रेरणादायी आहे. रयत शिक्षण संस्थेत बहुजनांची मुले शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडवीत आहे. बदलत्या काळानूसार अद्यावत शिक्षण प्रणाली स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छाया काकडे यांनी केले. प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते झाले. कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे व स्मिता पिसाळ यांनी केले. आभार अभिषेक कळमकर यांनी मानले.
