रावणाऐवजी लोकमकात्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कोथळा बाहेर काढून केले विसर्जीत
नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने हुतात्मा स्मारकात सार्वजनिक रीतीने शनिवारी (दि.12 ऑक्टोबर) लोकशाही दसरा साजरा करुन लोकशाहीला मारक असलेल्या लोकमकात्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कोथळा बाहेर काढून जोडे मारो करण्यात आले. तर या आंदोलनाच्या माध्यमातून लोकमकात्याला जाहिर विसर्जित करण्यात आले.
सार्वजनिक स्वरुपातील कर्तव्याबाबत मला काय त्याचे? अशी भूमिका घेणारे म्हणजे लोकमकाते घोषित करुन लोकमकात्या मुर्दाबाद, लोकभज्ञाक जिंदाबाद या घोषणांबरोबरच जय शिवाजी जय डिच्चू कावाच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या. या आंदोलनात या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, भारतीय जनसंसदेचे शहराध्यक्ष रईस शेख, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, वीरबहादूर प्रजापती, कैलास पठारे, विठ्ठल सुरम, पै. नाना डोंगरे, सुनील टाक, पोपट भोसले, सुरज भद्रे, ओम कदम आदी सहभागी झाले होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करुन आंदोलनाला प्रारंभ करण्यात आले. चार ते पाच हजार वर्षांपूर्वी मारले गेलेल्या लंकेच्या रावणाची पिळावळा आज लोकशाहीत देखील लोकमकात्या स्वरुपामध्ये कार्यरत आहेत. सत्ता, संपत्ती आणि फुकटची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सत्तापेंढाऱ्यांचे सगळीकडे पेव फुटले आहे. शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षी सत्तेवर राहिलेल्या सत्तापेंढारी यांनी 30 टक्के मतदारांवर प्रत्येकी रुपये 5 हजार डिव्हीडंड खर्च करणे सुरू ठेवले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, मागच्या वेळेला निवडून आल्यानंतर शहरातील रस्त्यांचे खड्डे या लोकांना संपविता आले नाही. शहरातील झोपडपट्टया या काळात वाढल्या, ताबामारी, टक्केवारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीतून आणि सत्तेचा गैरवापर करून कोट्यावधी रुपये गिळंकृत केलेल्या या सर्वांना पीपल्स हेल्पलाई आणि भारतीय जनसंसदेने लोकमकात्या घोषित केले आहे.
लोकमकात्या म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती ही 5 हजार वर्षांची भारतीय तत्त्वप्रणाली या लोकमकात्यांनी मोडीत काढली आणि सार्वजनिक संपत्ती घरी वाहून नेली. त्यातून सर्वत्र अनागोंदी निर्माण झाली. सत्ताकाळात ज्यांनी लोकांच्या कामाऐवजी गुन्हेगारींच्या टोळ्या पोसल्या अशा लोकमकात्यांचा कोथळा बाहेर काढून विजयादशमीला त्यांचे विसर्जन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
