• Thu. Mar 13th, 2025

आरोग्याचा जागर करुन महिला दिन साजरा

ByMirror

Mar 12, 2025

स्तन आणि सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी महिलांना मार्गदर्शन

बदलली जीवनशैली व तणावपूर्ण जीवनामुळे महिलांच्या आरोग्या विपरीत परिणाम -डॉ. सोनाली वहाडणे

नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने आरोग्याचा जागर करुन महिला दिन साजरा करण्यात आला. चाळीशीनंतर महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करुन महिलांना निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. महिलांमध्ये वाढत्या स्तन आणि सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी जागृती करण्यात आली.


या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सोनाली वहाडणे यांच्यासह माउंट लीटरा झी स्कूलच्या प्राचार्या शैलजा लोटके, विद्या कचरे, सुजाता कदम, एकता कदम, सुरेखा भोसले, सुशीला त्रिमुखे, सुरेखा चेमटे, जयाताई गायकवाड, प्रयासच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, विद्या बडवे, सोनी पुरनाळे, अर्चना बोरुडे, सुरेखा जंगम, अरुणा गोयल, अलका वाघ, सुनीता काळे, श्रद्धा उपाध्ये, सविता गांधी, हेमा पडोळे, प्रिया आठरे, ॲड. दीपिका दंडवते, शकुंतला जाधव, हिरा शहापुरे, आरती थोरात, आशा गायकवाड, उषा सोनी, लीला अग्रवाल, नीलिमा पवार, रेखा मैड, उषा सोनटक्के, रेखा फिरोदिया, ॲड. ज्योत्सना कुलकर्णी, मेघना मुनोत आदींसह ग्रुपच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


डॉ. सोनाली वहाडणे म्हणाल्या की, बदलली जीवनशैली व तणावपूर्ण जीवनामुळे महिलांच्या आरोग्या विपरीत परिणाम होत आहे. यामुळे स्तन आणि सर्वाइकल कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये झपाट्याने वाढत आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी आनंदी राहून नियमीत व्यायामाची गरज आहे. महिलांनी विशेषत: वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याकडे लक्ष द्यावे. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर महिलांमध्ये होणारे हार्मोन्स बदल हे आरोग्याशी निगडीत आहे. यासाठी महिलांना आपल्यामध्ये होणारे बदल देखील ज्ञात असले पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराबरोबर झोप महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तर दिवसाची सुरुवात आनंदी पणाने करा, योग्य आहार, व्यायाम, तणावमुक्तीबद्दल मार्गदर्शन केले. 9 ते 45 वयोगटातील महिलांना अँटी कॅन्सर व्हॅक्सीन घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्रास्ताविकात अलका मुंदडा यांनी मागील अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरण व महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने ग्रुपच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. प्राचार्या शैलजा लोटके यांनी भावी सक्षम पिढी घडविताना महिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट केले.


महिलांच्या विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा रंगल्या होत्या. विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. दीपा मालू यांनी विविध खेळ घेतले. अश्‍विनी सावंत यांनी सर्व महिलांना आकर्षक पध्दतीने मोफत नेल आर्ट करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार विद्या बडवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *