स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने उपमुख्यकार्यकारी अधिकारी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या बैठकीप्रसंगी विविध विभागाचे अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी मोरे यांच्यासह कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे, राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, उपमहासचिव निवृत्ती आरु, छानराज क्षेत्रे, सुहास धीवर, बाळू शिंदे, सिस्टर परिचारिका जिल्हाध्यक्षा कुंदा क्षेत्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा करुन स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपमुख्यकार्यकारी अधिकारी शेळके यांनी दिली. यावेळी सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग इत्यादी विभागातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या संबंधित स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
तसेच नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा कास्ट्राईबच्या वतीने सत्कार करण्यात आला. कुंदा क्षेत्रे यांनी कार्यरत व सेवानिवृत्त परिचारिका यांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली.
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघावर क्षेत्रे यांची नियुक्ती
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या छानराव क्षेत्रे यांची कार्यालयीन उपसचिवपदी तर कुंदा क्षेत्रे यांची परिचारिका अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार केला.