मारहाण एकतर्फी नसून, गुन्हे एकतर्फी दाखल करण्यात आल्याचा आरोप
स्थानिक युवक व महिलांचे जिल्हा पोलीस अधीक्षक व तोफखाना पोलीस स्टेशनला निवेदन; अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे एकतर्फी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले असून, मारहाण करणाऱ्या समोरच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नसल्याचा आरोप करुन स्थानिक महिला व युवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व तोफखाना पोलीस स्टेशनला निवेदन दिले. तर संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास तोफखाना पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी शारदा भुजबळ, बानो सारसर, नलिनी छजलानी, शीला पटोणा, हिना शेख, सविता साळुंखे, शितल सारसर, संध्या गायकवाड, दुर्गा दळवी, सोनाली शेळके, दिव्या भवाळ, आरती सकट, अनिता पवार, प्रिया भवाळ, जेनी दिवटे, उषा साठे, सोनम येवले, नितीन बोरगे, स्वप्निल ससाणे, मयूर साठे, प्रेम शिंदे, यश पडाळे, गणेश पवार, मुन्ना शेख, कपिल देठे, गौरव दिवटे, अभि साठे, समद शेख, आनंद साठे, रमेश साळुंखे, अभी साखरे, कविता बोरगे आदी नागरिक उपस्थित होते.
22 जुलै रोजी पवन पवार यांच्या कुलस्वामिनी देवीची जत्रा होती. त्यांचे कुटुंबीय नातेवाईक व मित्रमंडळी यांनी देवीचे उत्सव साजरा करीत होते. त्याचवेळी जितू चव्हाण, रोहन चव्हाण यांनी पूर्वनियोजित कटानुसार पवन पवार व त्यांचे मित्र मंडळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी पवन पवार व त्यांच्या मित्रांनी विरोध केला असता, चव्हाण व हंस यांनी त्यांच्या घरातील महिलांद्वारे तोफखाना पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले. त्यांनी देवीच्या जत्रा उत्साहात विघ्न आणण्याचा प्रकार घडविला. वास्तविक पाहता संबंधीतांनी पवन पवार यांच्या मित्रावरती तलवारी व इतर हत्यारांच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला.
या मारहाण प्रकरणाला हप्ता उलटून गेला आहे. मात्र पोलीसांनी फक्त सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेऊन एकतर्फी गुन्हे दाखल केलेले आहेत. पवन पवार यांचे मित्र व कुटुंबीयांना जबर मारहाण करण्यात आलेली असून, ते यामध्ये जखमी झालेले आहेत. याचा कुठल्याही प्रकारे गांभीर्याने विचार केला गेलेला नाही. पोलीस प्रशासनाने दुसरी बाजू देखील पाहून संबंधीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करुन न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.