• Wed. Nov 5th, 2025

अटलांटिक महासागरात नगरचे भूमीपुत्र कॅप्टन शकील सय्यद यांनी वाचवले अनेकांचे प्राण

ByMirror

Nov 22, 2023

वादळामुळे भरकटलेल्या बोटी मधील नागरिकांना मिळाले जीवदान

रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सर्व नागरिकांची सुखरुप सुटका

अहमदनगर (प्रतिनिधी)- अटलांटिक महासागरात वादळामुळे भरकटलेल्या बोटी मधील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी नगर शहरातील भूमीपुत्र कॅप्टन शकील सय्यद यांनी केली आहे. शिस्तबद्ध व धाडसी ऑपरेशनमुळे भरकटलेल्या बोटीतील नागरिकांना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुखरुप वाचविण्यात आले.


तपोवन रोड येथे वास्तव्यास असलेले कॅप्टन शकील सय्यद हे मर्चंट नेव्ही मध्ये मागील वीस ते पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे. ते अटलांटिक महासागरातून मोरोक्को ते ब्राझील दरम्यान जहाजाने प्रवास करत होते. 27 ऑक्टोबरच्या रात्री त्यांना काळोख्यात दिवा नसलेली व वादळामुळे भरकटलेली एक बोट दिसून आली. त्यानंतर या बोट मध्ये अनेक लोक अडकले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना वाचविण्यासाठी कॅप्टन सय्यद यांनी जवळच्या किनारपट्टी स्टेशनला संदेश पाठविला. त्यानंतर मरिन रेस्क्यू को ऑर्डिनेशन सेंटर (एमआरसीसी) कडून सय्यद यांना बचाव जहाज पाठविण्यात आला असून, तुम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवा व बोटीचे स्थान आणि हालचालीची वेळोवेळी माहिती देण्याचे सांगण्यात आले.


अंधारात सय्यद यांनी बोटवर नजर ठेऊन एमआरसीसीला बोटीची वेळोवेळी माहिती कळविली. जोरदार वादळी वाऱ्यांमुळे खूप आव्हानात्मक आणि कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये कॅप्टन सय्यद यांनी बोटीला मदत कार्य पोहचविण्यासाठी बचावात्मक तयारी सुरु केली. 8 तासानंतर बचाव कार्य करण्यासाठी रेस्क्यू बोट समुद्रात पोहचली. काही तासांच्या कारवाईनंतर भरकटलेल्या बोटीतील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचे प्राण वाचविण्यात आले.


अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे कॅप्टन शकील सय्यद यांचे बचाव कार्यासाठी आलेल्या जवानांनी कौतुक करुन त्यांच्या कार्याला सलाम केले. कॅप्टन शकील सय्यद हे शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांचे मोठे बंधू आहेत. कोरोना काळात दोन्ही बंधूंनी गरजू घटकांना आधार देऊन अन्न-धान्याची मदत पोहचविण्याचे कार्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *