गॅस कंपनी व संबंधित एजन्सीवर गुन्ही दाखल करण्याची मागणी
मागील 7 वर्षापासून कुटुंबीय भरपाईच्या प्रतिक्षेत
नगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस टाकीची गळती व स्फोट होऊन दुर्घटनेत जबाबदार असणाऱ्या एचपी गॅस कंपनीकडून पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. तर गॅस कंपनी व संबंधित एजन्सीवर गुन्ही दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याचे म्हंटले आहे.
छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, जिल्हा सचिव हजरत शेख, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, छावा संघटनेच्या मालनताई जाधव, दत्ता वामन, प्रमोद जौंजाळ, कविता जौंजाळ, सचिन जौंजाळ, नंदाबाई शेंडे, सोनल जौंजाळ, विशाल जगताप, सिद्धांत पाटोळे आदी सहभागी झाले होते.
श्रीरामपूर येथे 24 डिसेंबर 2017 रोजी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपनीच्या गॅस टाकीची गळती व मोठा स्फोट होऊन मोठी दुर्घटना झाली होती. यामध्ये पाच कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गौरव बागुल यांच्यासह चंद्रकांत जौंजाळ, सचिन जौंजाळ, प्रमोद जौंजाळ, मधु बागूल यांच्या गृहपयोगी साहित्य आणि मंडप डेकोरेशनचे साहित्य, मंडप, डीजे सिस्टिम आदी महागड्या वस्तू जळून खाक झाले होते. यामध्ये सदर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पीडित कुटुंबाने वेळोवेळी गॅस एजन्सीकडे तक्रार व पाठपुरावा करून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु त्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. श्रीरामपूर येथील गॅस एजन्सी यांनी ग्राहकांना व्यवस्थित सेवा देणे गरजेचे होते, परंतु सदर गॅस एजन्सीने काळजी घेतली नव्हती. त्यामुळे संबंधित गॅस एजन्सीचा देखील परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांचा, तलाठी व तहसीलदार यांचा पंचनामा तसेच ग्रामपंचायत कार्यालय दत्तनगर श्रीरामपूर यांनीही दुर्घटनेचा दाखला दिलेला आहे. श्रीरामपूर नगर परिषदेचे अग्निशमन वाहनांनी सुमारे एक तास प्रयत्न करून आग विझवली. याबाबत अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पीडितांकडे बिलाची मागणी केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस टाकीची गळती व स्फोट होऊन दुर्घटनेत जबाबदार असणाऱ्या एचपी गॅस कंपनीकडून पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी आणि दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या कंपनी व गॅस एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.