• Sun. Jun 1st, 2025

रामवाडीत कचरा वेचकांच्या रेशन कार्डचे केवायसी अपडेटसाठी शिबिर

ByMirror

Dec 7, 2024

लाभार्थींना डिजीटल रेशन कार्डचे वितरण; कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा पुढाकार

खऱ्या लाभार्थींना राष्ट्रीय अन्न पुरवठा सुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील -सपना भोईटे

नगर (प्रतिनिधी)- शहरातील कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने रामवाडी येथील कचरा वेचक कष्टकऱ्यांसाठी रेशन कार्डचे केवायसी अपडेट करण्याचे शिबिर राबविण्यात आले. तर प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थींना डिजीटल रेशन कार्डचे वितरण तहसीलदार तथा अन्न धान्य पुरवठा अधिकारी सपना भोवते यांच्या हस्ते करण्यात आले.


या शिबिरासाठी सहाय्यक महसुल अधिकारी (अव्वल कारकुन) व्ही.ए. बेल्हे, संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे, कचरा वेचक सभासद लंकाबाई शिंदे, सिंधू साबळे, कालिंदा धाडगे, लंकाबाई शेलार, सुशिला दिवटे, अंजना शेलार, अनुसया सोनवणे आदींसह कचरा वेचक लाभार्थी उपस्थित होते.


सपना भोवते म्हणाल्या की, खऱ्या लाभार्थींना राष्ट्रीय अन्न पुरवठा सुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी संघटना प्रशासनासाठी दुवा म्हणून काम करत आहे. या शिबिराच्या माध्यमातून गरजूं पर्यंत शासनाच्या योजना त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


विकास उडानशिवे म्हणाले की, केचर वेचकांना शासनाच्या राष्ट्रीय अन्न पुरवठा सुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी केवायसी अपडेट करणे आवश्‍यक झाले आहे. मात्र यासाठी मोठा वेळ व हेलपाटे मारावे लागत असल्याने कष्टकरी या कामासाठी गेल्यास त्याचा रोजगार बुडतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. अशा परिस्थितीमध्ये कचरा वेचकांना त्यांच्या वेळेत हे शिबिर राबवून केवायसी अपडेट करुन डिजीटल रेशनकार्ड मिळवून देण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून सुरु आहे. असंघटित कामगारांच्या धर्तीवर कचरावेचकांना राष्ट्रीय अन्न पुरवठा सुरक्षा अधिनियम 2013 अन्वये असंघटित कामगार असलेल्या कचरावेचकांना प्राधान्याने लाभ मिळण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिराच्या माध्यमातून रेशन दुकानदार युवराज लांडगे, खताडे, बाळासाहेब दिघे यांनी कचरा वेचकांचे केवायसी अपडेट करुन दिले. यावेळी रामवाडी भागातील नागरिक व कचरा वेचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *