बिरोबा महाराज यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात
जिल्हाभरातून बैलगाडा मालक-चालकांचा उत्स्फूर्त सहभाग
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराज यांच्या वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले. संपूर्ण नगर जिल्ह्यातून बैलगाडा मालक व चालकांनी या शर्यतीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. बैलगाडा घाटात भिर्रर्र… ची आरोळी घुमली आणि वातावरण ढोलताशा व तुतारीच्या निनादाने दुमदुमले.
ग्रामस्थांच्या वतीने वाजतगाजत बैलांचे स्वागत करण्यात आले. सकाळी सुरुवात झालेली शर्यत संध्याकाळपर्यंत रंगली. पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शर्यतीचा आनंद लुटला. एकाच दिवशी तब्बल 70 बैलगाड्यांनी घाटात दमदारपणे पळाले.
या शर्यतीमध्ये पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक : मयुर सुरसे (भाळवणी), गिरीष वाखारे व अतुल खरमाळे (जुगलबंदी, भांडगाव), द्वितीय क्रमांक : कानिफनाथ बैलगाडा संघटना (निमगाव वाघा), स्वामी समर्थ बैलगाडा संघटना, जयराम आहेर (धुळ्या ग्रुप, गोरेगाव), तृतीय क्रमांक : गणेश कोकाटे, अभिजीत उंडे (जुगलबंदी), बाळासाहेब तन्मर (राहुरी) यांनी बक्षीसे मिळवली. वैभव पायमोडे यांनी फळीफोड प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तर घाटाचा राजा हा मानाचा सन्मान अभिजीत उंडे व गणेश कोकाटे (जुगलबंदी) यांना देण्यात आला.
विजेत्यांना अनुक्रमे 51 हजार, 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे रोख बक्षीस व गौरवचिन्ह देण्यात आले. हे बक्षीस राजेंद्र शिंदे, समर्थ क्रॉप केअर आणि निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण फलके, दूध डेअरीचे चेअरमन अण्णा जाधव, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव, उपसरपंच किरण जाधव, नगर तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य भरत फलके, तसेच संजय कापसे, कचरु कापसे, बाबा केदार, सागर कापसे, अतुल फलके, ज्ञानदेव कापसे, किरण कापसे, बंटी जाधव, बापू कापसे, अमोल कापसे, गणेश कापसे, तेजस कापसे आदी उपस्थित होते.
निमगाव वाघा येथे बिरोबा महाराज यात्रेनिमित्त या वर्षी आयोजित बैलगाडा शर्यत गावाचा आणि पंचक्रोशीचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा ठरला. ही शर्यत पारंपरिक उत्साह, निष्ठा आणि स्पर्धात्मकतेने सजली. बैलगाड्यांचे घाटात वेगाने धावणे, मालकांची जिद्द, प्रेक्षकांची उसळलेली गर्दी आणि ढोल-ताशांचा गजर यामुळे निमगाव वाघा परिसर पूर्णतः यात्रामय वातावरणाने भारवले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कानिफनाथ तरुण मंडळ, श्री नवनाथ युवा मंडळ, एकता फाऊंडेशन, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था आणि निमगाव वाघा ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.