केंद्र सरकारने बुध्दगया बौद्ध भिकू यांच्याकडे सोपवावे; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
नगर (प्रतिनिधी)- देशातील इतर धर्मियांचे धार्मिक स्थळे त्यांच्या ताब्यात असताना, बिहार मधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिकू यांच्याकडे सोपविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जिल्ह्यातील बौध्द समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मोरे यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील भन्ते, भिकू, उपासक, उपासिका व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिहार मधील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिकू यांच्याकडे येण्यासाठी 12 फेब्रुवारी पासून बोधगया मुक्ती आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास जिल्ह्यातील समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शवून सुरु असलेल्या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बिहार येथील बुध्दगया हा ऐतिहासिक महत्त्व असलेले धार्मिक स्थळ आहे. या स्थळाला बौद्ध समाजात अत्यंत महत्त्व आहे. हे स्थळ भारतीय संस्कृती व बौद्ध धर्माचे महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. भारत देशाच्या संविधानाप्रमाणे विविध धर्माचे धर्म स्थळे त्यांच्या धर्माच्या धर्मगुरुंच्या ताब्यात असून, तेथे दररोज धार्मिक परंपरेनुसार पूजा चालत आहे. फक्त बुध्दगया बौद्धांच्या ताब्यात नसून, बुध्दगया हे बौद्धांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे, तेथे बौद्ध धर्मानुसार पूजा करता येऊ शकणार असल्याचे म्हंटले आहे.
बुध्दगया हे एक पुरातन कालीन सम्राट अशोक राजाने बांधलेले विहार आहे. ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ बांधले गेले होते. हा बुद्ध विहार बौद्ध धर्माची आस्था व अस्मिता आहे. हा बुद्ध विहार मुक्त होण्यासाठी बौद्ध समाजाच्या वतीने देशभर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. तर बुध्दगयाच्या मुक्तीसाठी तेथे बुद्ध धर्माचे धर्मगुरू व भिकू आंदोलन करत आहे. त्यांची तब्येत बिघडत चालली असून, तातडीने केंद्र सरकारने बुद्धगया बौद्ध धर्मगुरूंकडे सोपवण्याची मागणी बौध्द समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. बुध्दगया मुक्ती आंदोलन हे या स्मारकाचे संरक्षण करण्यासाठी असून, जे येणाऱ्या बौध्द पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.