बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी
बोधगया महाविहार कायदा 1949 चा अन्यायकारक कायदा रद्द करण्याच्या घोषणा
नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी शहरातून मंगळवारी (दि.25 मार्च) रणरणत्या उन्हातून दुपारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बौध्द समाजातील बांधवांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला बौध्द समाजाच्या वतीने भारत बंदचा इशारा देण्यात आला आहे.
मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाचे प्रारंभ करण्यात आले. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज व माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहाराने अभिवादन करुन मोर्चाचे पुढे मार्गक्रमण झाले. बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबौध्दि बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी व बोधगया महाविहार कायदा 1949 चा अन्यायकारक कायदा रद्द करण्यासाठी समाजबांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात बौध्द धर्माचे प्रतिक असलेले पंचशील ध्वजासह महाबौध्दि बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याचे फलक हातात घेण्यात आले होते. मोर्चातील रथात भगवान बुध्द व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासह भन्ते व भिक्खू उपस्थित होते.

माळीवाडा मार्गे पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, चितळे रोड व दिल्ली गेट येथून सिध्दीबाग येथील बुद्धविहारात या मोर्चाचा समारोप सभेतून झाला. यावेळी विविध आंबेडकरी चळवळीतील पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी लावून धरली.
सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धाला ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात; मात्र या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी 1992 पासून आंदोलन होत आहेत. तरी सुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. त्यामुळे पाच हिंदू धर्मीय यांचे प्राबल्य असल्याने बौध्द गया येथील महाविहारात पुजा आणि कर्मकांड सुरु आहे. मात्र बौद्ध धर्म गुरुंना त्यांच्या विधीप्रमाणे पूजेचा अधिकार मिळत नाही. ज्या रूढी परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तेच कर्मकांड येथे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारतीय राज्यघटनेचे कलम 13 नुसार घटना लागू होण्यापूर्वी केलेले सर्व कायदे आणि नियम निरस्त केले आहेत. मात्र तरी देखील देशात 1949 चा नियमबाह्य कायदा लावून बौध्द समूहाचे धार्मिक अधिकार काढून घेण्यात आले असल्याचे बौध्द समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
महाबोधी महाविहार (बोधगया, बिहार) हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून, बोधगया महाविहार कायदा 1949 चा अन्यायकारक कायदा रद्द करावा, बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्या, केंद्र सरकार आणि बिहार सरकारने आपले विशेष अधिकार वापरून 1949 चा कायदा दुरुस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.