• Tue. Nov 4th, 2025

मेंडका नदीवर पूल मंजूर; 3 दशकांची ग्रामस्थांची मागणी पूर्ण

ByMirror

Sep 2, 2025

आमदार काशिनाथ दाते यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

नगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीतील मेंडका नदीवरील पूल बांधण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्‍न अखेर सुटला आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यास परिसरातील वाडी-वस्तींचा गावाशी संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत होते. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीची तात्काळ दखल घेत आमदार काशिनाथ दाते यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत पूल बांधणीचे काम मंजूर करून घेतले आहे.


पूल मंजूर करून दिल्याबद्दल बाबुर्डी घुमट येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार काशिनाथ दाते यांचा सत्कार उत्साहात पार पडला. या वेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर पूल मंजूर झाल्याने ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याची भावना सरपंच नमिता पंचमुख व मा. उपसरपंच तान्हाजी परभाने यांनी व्यक्त केली आहे.


गेल्या तीन दशकांपासून ग्रामस्थ या नदीवर पुलासाठी मागणी करत होते. पावसाळ्यात नदीला पूर आल्याने चव्हाण मळा, कुंजीर मळा, दरेकर मळा, हिंगे मळा या भागातील ग्रामस्थांचा गावाशी संपर्क पूर्णपणे तुटत असे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत होता. अखेर आमदार दाते यांनी नवीन पूल मंजूर केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर बाबुर्डी घुमट कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीत येतो. प्रशासकीयदृष्ट्या ही हद्द श्रीगोंदा तालुक्यात असली तरी मतदारसंघ पारनेर असल्याने पुलाचे काम रखडले होते. या राजकीय सीमारेषांमुळे विकासकामांना अडथळा निर्माण झाला होता. मात्र आमदार दाते यांनी जिल्हा नियोजन समितीमधून हा प्रश्‍न मार्गी लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *