उमंग फाऊंडेशनचा उपक्रम
दुर्धर आजारांना कायमचे नष्ट करण्यासाठी आयुर्वेद हा सर्वोत्तम पर्याय -डॉ. संतोष गिऱ्हे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व आजारांवर अतिशय परिणामकारक सिद्ध होत असलेल्या आयुर्वेद शास्त्राचा भारतीयांनी अवलंब करण्याची गरज आहे. जीवनमान बदलल्याने आजार व व्याधी वाढल्या आहेत. जीर्ण आजार शरीरातील इतर अवयवांमध्ये दोष निर्माण करतात. या दुर्धर आजारांना कायमचे नष्ट करण्यासाठी आयुर्वेद हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे यांनी केले.
उमंग फाऊंडेशनच्या वतीने शहरात राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवसनिमित्त हाडांच्या समस्येवर आयोजित शिबिरात डॉ. गिऱ्हे बोलत होते. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. धनाजी बनसोडे, संतोष गोटीपामुल, युवराज लकडे, वैभव खरमाळे, रखमा बाबुराव सासवडे, सरूबाई सासवडे, वैशाली कुलकर्णी, ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. गिऱ्हे म्हणाले की, दैनंदिन आहार पध्दतीत बदल होत असल्याने मनुष्याच्या जीवनात आजारांच्या व्याधी वाढल्या आहेत. मनुष्याच्या शरीरास हिरव्या पाणांचा रस, सर्व फळ, भाज्या आवश्यक असून, लहान मोठ्या आजारांसाठी आयुर्वेद हे सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. चुकीच्या लाईफस्टाईलने आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाची माहिती त्यांनी दिली.
या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची हाडांच्या विकारावर तपासणी करण्यात आली. तर हाडांच्या विकारावर आयुर्वेद उपचार पध्दतीने मात करण्यासंदर्भात आणि व्यायाम, आहारबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.