• Mon. Jul 21st, 2025

पांढरीच्या पुलावर ग्रामस्थांचा रस्ता रोको

ByMirror

Feb 17, 2024

वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा उपाय योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा उपाय योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने वांगोळी ग्रामस्थांच्या वतीने पांढरीच्या पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. अपघातामध्ये अनेकांचा जीव जात असताना व अनेकांना अपंगत्व आलेले असताना देखील संबंधित विभागाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरुन तीव्र निदर्शने केली.


या रास्ता रोकोमुळे पांढरीपुल परिसरात काही वेळ वाहतुक खोलंबली होती. या आंदोलनात वांजोळी सोसायटीचे चेअरमन बद्रीनाथ खंडागळे, सरपंच आप्पा खंडागळे, खोसपुरीचे सरपंच सोमनाथ हारेर, राष्ट्रीय मुलनिवासी ट्रेड युनियनचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, छावाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, सरपंच अवी आव्हाड, दत्ता वामन, शाहीर कान्हू सुंबे, महेश काळे, वाघवाडी सरपंच पांडुरंग वाघ, नवनाथ पागिरे, मेजर उमाकांत ससे, साहेबराव येळवंडे, वैभव खंडागळे, अशोक खंडागळे, मिलिंद भवार, रावसाहेब भवार, शिवाजी भवार, हरिभाऊ हारेर, गणेश भिसे, गणेश शिंदे, बाबासाहेब भवार, दत्तात्रय भवार, संजय जवरे, देविदास भिसे, बन्सी भवार, निलेश आव्हाड, अण्णादास दाणी, आसाराम चोथे, गोरख भवार, नवनाथ बोरुडे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.


पांढरीपूल हे ठिकाण घाट पायथ्याशी असल्याने परिसरात अनेक अपघात होत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आलेले असून, या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना होत नसल्याने अपघात होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
या रस्त्यावर दिशादर्शक फलक, स्पीडब्रेकर, गाव चिन्ह आदी न बसवल्यामुळे अपघात होत आहेत.

ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन देखील याची दखल घेण्यात आलेली नाही. जागतिक बँक प्रकल्प अभियंता यांनी या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन देखील उपाययोजना न करता फक्त आश्‍वासन दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपघात टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मागण्यांचे निवेदन सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मेढे, जागतिक बँकेचे उपअभियंता अभय भांगे यांना देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *