दुष्काळी परिस्थिशी सामना करण्यासाठी शेतकरी वर्ग एकवटले
नगर (प्रतिनिधी)- दुष्काळी परिस्थिती हटवून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने ह.भ.प. रामकृष्ण महाराज व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये नान्नज दुमाला (ता. पारनेर) येथे काळी आई ओल संवर्धन अक्षय कुंभ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्ताह कार्यक्रमानिमित्त हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
1972 नंतर गेली 52 वर्ष नान्नज दुमाला, तळेगाव परिसरामध्ये दुष्काळ फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून लाखो कुटुंबांचे नुकसान झालेले आहेत. त्यामुळे या भागात जमिनींमध्ये ओल टिकून ठेवणे आणि ते वर्षभर राहणे याला फार महत्त्व आहे. यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये काळी आई धनराई हा कार्यक्रम उपस्थितांनी मंजूर केला.
आपल्या शेतामध्ये या तंत्राचा अवलंब करणारे विनायकराव गुंजाळ आणि भीमराज पाटील चत्तर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना रामकृष्ण महाराज म्हणाले की, ज्ञानेश्वरी मध्ये महावनेची लावावी, जलाशये निर्मावी अशा अर्थांची ओवी आहे. या ओवीची अंमलबजावणी नान्नज आणि पंचक्रोशीतील दुष्काळी लोकांनी जर केली तर नक्कीच क्रांती होईल. या भागात झाडतोड फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि वनधनराईमुळे हा संपूर्ण भाग हिरवा व्हायला मदत होणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांनी या भागाच्या पाणी प्रश्नाबाबत सर्व काही ते सहकार्य केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. सदर भागातील जनतेला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये ॲड. कारभारी गवळी यांनी काळी आई ओल संधारण कार्यक्रम आणि रेनगेन बॅटरी म्हणजे काय। याबाबतची माहिती दिली. ॲड. गवळी यांनी रेनगेन बॅटरी म्हणजे पावसाचा पडलेला प्रत्येक थेंब तातडीने जमिनीखाली गेला पाहिजे आणि त्यासाठी पाच एकराच्या जमिनीमध्ये दोन-तीन ठिकाणी वीस फूट लांब तीन फूट रुंद आणि आठ फूट खोलीचे खड्डे तयार करायचे आहे. त्यामध्ये दगड गोटे टाकून ते खड्डे भरायचे आणि वरच्या भागांमध्ये जाड मुरूम टाकायचा आणि हे खड्डे उताराच्या बाजूला असल्यामुळे पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये सोडून दिले की हे खड्डे तातडीने भरतात आणि संपूर्ण जमिनीच्या खालच्या बाजूला ओल निर्माण होते.
ही ओल पुरे वर्षभर टिकून राहण्यास मदत होते आणि त्यातून या भागातील फळबागायती किंवा रब्बी आणि खरिपाची पिकं आहेत त्यांना जर कदाचित पावसाने एक महिना दिरंगाई केली तरीही सुद्धा खालच्या ओलीमुळे पाऊस उशीरा अथवा कमी झाला तरी या ओलमुळे पिकांवर विपरीत परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कालपर्यंत जलसंधारणांची काम ही अशा पद्धतीने केली जायची की, ज्यामध्ये पावसाचे पाणी फक्त साठवले जायचे. हे पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून उडून जायचे. त्याच्यामुळे फक्त 20 टक्क्यापर्यंत पाणी जमिनीमध्ये मुरले जायचे. परंतु काळी आई ओल संधारण किंवा रेनगेन बॅटरीमुळे 80 टक्के पाणी बाष्पीभवनापासून वाचते व जमीनीच्या खाली साठून ओल टिववून ठेवता येते. रेनगेन बॅटरीमुळे खालच्या भागांमध्ये जमलेले पाणी शेजारच्या विहिरींना नक्की येईल आणि त्या विहिरींवर मोटारी बसून ठिबक पद्धतीने हे पाणी पिकांना जर दिले पिके पावसाअभावी वाचू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे शाश्वत शेती करुन डाळिंबाच्या बागा, चिंचेच्या बागा फुलवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकणार आहे. गेली 52 वर्ष दुष्काळच्या खाईमध्ये सापडलेले शेतकरी चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.