केडगावच्या प्रभाग 16 मध्ये स्वखर्चाने कचरा संकलनाला सुरुवात
प्रभागाची स्वच्छतेकडे वाटचाल
नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मधे गेल्या दहा दिवसांपासून महानगरपालिकेच्या घंटागाड्या न फिरल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचून अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने व होत असलेल्या गैरसोयीची तात्काळ दखल घेत भाजपचे सुजय अनिल मोहिते यांनी स्वतःच्या खर्चाने कचरा संकलन मोहिमेला सुरुवात केली आहे.
या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून, या कामामुळे परिसर स्वच्छ होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांची अस्वच्छता व पसरलेली दुर्गंधी दूर झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करुन या उपक्रमाचे कौतुक करत आहे.
सुजय अनिल मोहिते म्हणले की, नागरिकांशी रोजचा संपर्क असल्याने ते प्रश्न घेऊन येत असतात. परिसरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाल्याने नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. प्रभागातील कचरा व अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असल्याने, अखेर स्वखर्चाने का होईना हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेऊन कचरा संकलन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
नागरिकांचे देखील सहकार्य मिळत असल्याने लवकरच हा प्रश्न पूर्णपणे सुटणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुजय मोहिते यांनी स्वखर्चाने सुरु केलेल्या कचरा संकलन मोहिमेद्वारे ट्रॅक्टर, जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने प्रभागातील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे प्रभागातील कचऱ्याचे साम्राज्य हळूहळू संपुष्टात येऊन रस्त्यांवर पुन्हा स्वच्छता निर्माण होत आहे.