• Wed. Jul 2nd, 2025

निमगाव वाघात मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांची सायकल रॅली

ByMirror

Oct 23, 2024

कुटुंबातील सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह धरण्याची घेतली शपथ

सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी -पै. नाना डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणुक विभाग यांच्या निर्देशानूसार नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी गावातून सायकल रॅली काढून ग्रामस्थांना मतदानाचा पवित्र हक्क राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बजाविण्याचे आवाहन केले. तर मतदार असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह धरण्याची शपथ घेतली.


नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, दिपक ठाणगे, निता सोनवणे, सुनिता दिघे, शिवाजी धस, रामदास साबळे, अमोल वाबळे, भानुदास लंगोटे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.


या अभियानात मतदार यादीत नांव समाविष्ट करणे व मतदान करण्याबातची मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तर नाव मतदार यादीत नोंदवणे, नाव दुरुस्ती आदी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, शंभर टक्के मतदान झाल्यास चांगला व सक्षम उमेदवार निवडून येण्यास मदत होणार आहे. पन्नास टक्के पेक्षा कमी मतदान होणे हे लोकशाहीला घातक आहे. आजची युवाशक्ती हीच आपल्या देशाची सर्वात मोठी राष्ट्रशक्ती असून, युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी. मतदानाचा पवित्र हक्क राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बजाविल्यास शंभर टक्के मतदान घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


उत्तम कांडेकर म्हणाले की, मतदानाने लोकशाही मजबूत होणार आहे. मतदान हे आपल्यासह भावी पिढीचे भवितव्य घडविणारे आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *