केडगावात नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वखर्चाने कचरा गाडी
कचरा नाही, जबाबदारी उचलतोय -भूषण गुंड
नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. महानगरपालिकेच्या घंटागाड्या फिरत नसल्यामुळे रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी, डास व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर संदीप (दादा) कोतकर युवा मंचच्या वतीने अध्यक्ष भूषण अशोक गुंड यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेत स्वखर्चातून कचरा संकलनासाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करून दिली.
या उपक्रमांतर्गत केवळ कचरा उचलणे नव्हे तर परिसरातील झाडी, गवत, झाडांच्या लोंबकळणाऱ्या फांद्या कापून संपूर्ण परिसरात स्वच्छतेची चळवळ राबवण्यात आली. परिसरात ज्या ठिकाणी स्वच्छतेसाठी महापालिकेचा वाव नव्हता, तेथे जाऊन परिसराची स्वच्छता करण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली समस्या आता सुटल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते.
कचरा संकलन गाडीचे लोकार्पण भूषण अशोक गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरविंद मिसाळ, रोहित शिंदे, अक्षय शिंदे, आलोक कांबळे, सागर बोरगे, तुषार शिंदे, युवराज गावडे, ऋषिकेश ठुबे, अभि ठुबे, ओंकार क्षेत्रे, बाळा बेल्हेकर, रोशन बोरुडे यांचा समावेश होता. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होत्या संध्या कांबळे, सविता बोरुडे, सुनीता बनकर, मंगल मिसाळ, मीना चोभे, इंदु भोजने, सविता पाटील, शांता कुटे, पूजा कांबळे, सुरेखा गावडे, शारदा लिगडे आदींसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूषण अशोक गुंड म्हणाले की, प्रभाग 16 मधील अस्वच्छतेची परिस्थिती पाहून खूप व्यथित झालो. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. महानगरपालिका वेळेवर घंटागाड्या न पाठवल्यामुळे रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले होते, दुर्गंधीने जगणं मुश्कील झालं होतं. म्हणून आम्ही स्वखर्चातून कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करून दिली. कचरा नाही, तर जबाबदारी उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा उपक्रम फक्त एक सुरुवात आहे. केवळ कचरा साफ करून आम्ही थांबणार नाही. तर लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू करणार आहे. केडगावमधील नागरिक महापालिकेला सर्व कर भरतात, मग त्यांना सर्व सुविधा मिळायलाच हव्यात. आपल्या भागात स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्ते या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देखील गुंड यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल प्रभागातील नागरिकांनी संदीप (दादा) कोतकर युवा मंचचे आभार मानले.
