अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावातील विविध विकास कामाचे भूमीपूजन पार पडले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथील सभा मंडप व रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते झाले. भाजपा युवा मोर्चाचे केडगाव अध्यक्ष सुजय अनिल मोहिते यांच्या पाठपुराव्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून सदर काम मार्गी लावण्यात येत आहे. यावेळी स्वामी सेवा केंद्र मधील सेवेकरी व केडगाव भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभय आगरकर म्हणाले की, केडगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात भाविकांची वाढती संख्या पाहून सभा मंडपाने मोठी सोय होणार आहे. सुजय मोहिते यांनी भविष्याच्या दृष्टीकोनाने भाविकांच्या सोयीसाठी पाठपुरावा करुन सभा मंडपाचा प्रश्न मार्गी लावला आहे. प्रभाग 16 मध्ये त्यांचे समाजकार्य सुरु असून, त्यांच्या पाठीशी भाजप पक्ष उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुजय मोहिते म्हणाले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करत आले आहेत. शहरासह उपनगरात देखील भरीव निधी उपलब्ध करुन विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगावमध्ये विकास कामांसाठी पाठपुरावा सुरु असून, खासदार विखे यांनी रस्त्यासाठी देखील मोठा निधी उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.