शिक्षणासाठी आलेल्या गरजू व निराधार विद्यार्थ्यांचा राहण्याचा प्रश्न सुटणार
संस्थेत उपेक्षित, निराधार मुलांचे भवितव्य घडविण्याचे कार्य सुरु -अविनाश बानकर
नगर (प्रतिनिधी)- गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. वस्तीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना राहण्याचा प्रश्न नवीन इमारतीच्या माध्यमातून सुटणार आहे.
प्रजासत्ताक दिनी वस्तीगृहात झालेल्या कार्यक्रमात नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन उद्योजक अविनाश बानकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रकाश पवार, महेश हरकड, वस्तीगृहाचे संस्थापक अध्यक्ष मोहन शिंदे, उपाध्यक्ष बाबाभाऊ शिंदे, सचिव अनिल सावंत, सहसचिव दयाराम सावंत, तानाजी सावंत, खजिनदार अनिल चौगुले, सदस्य अजय तांबिले, अजय शिंदे, करण शेगर, सागर शिंदे, विजय शेगर, अक्षय सावंत, शालन शिंदे, अनिता सावंत, वस्तीगृह अधीक्षक रोहित सावंत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीवर गीत, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थ भारावले. प्रास्ताविकात मोहन शिंदे यांनी छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात 58 निराधार मुले-मुली शिक्षण घेत आहेत. ही संस्था विनाअनुदानित तत्त्वावर चालत असून, समाजातील दानशूर व्यक्ती व लोकवर्गणीतून या मुलांचे पालनपोषण व शिक्षणाचा खर्च भागवला जात असल्याची माहिती दिली.
उद्योजक अविनाश बानकर यांनी सामाजिक संवेदना जागृक ठेऊन कार्य करणाऱ्यांच्या सहकार्याने ही संस्था चालत आहे. या संस्थेत उपेक्षित, निराधार मुलांचे भवितव्य घडविण्याचे कार्य सुरु आहे. अनाथ, निराधार मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांनी हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले.