सांस्कृतिक, परंपरेचे दर्शन घडवून विविध सामाजिक विषयांवर जागृती
जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार महत्त्वाचे -शारदा ढवण
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रासह देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. तर नृत्याविष्कारातून विविध सामाजिक विषयांवर जागृती केली. देशभक्तीवर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साह संचारला होता. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला.
भिस्तबाग शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी वडगावगुप्ता केंद्रप्रमुख पोपट धामणे, माजी नगरसेविका शारदाताई ढवण, दिपालीताई बारस्कर, योगिता वाघमारे, अनिल ढवण, शरद धलपे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शिवबा राजं…, आंम्ही शिवकन्या…, मोरया मोरया…, बालगीते, माऊली माऊली…, आरंभ है, प्रचंड है… या गीतांसह शिवराज्याभिषेक सोहळा, साईबाबा पालखी आदी विविध गीतांवर ठेका धरुन एकच धमाल केली. सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी, परिसरातील नागरिक व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. राजमाता जिजाऊ यांना वंदन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका अनिता काळे म्हणाल्या की, शहरालगत असलेली भिस्तबाग जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या जोरावर नावरुपास आली आहे. सर्वसामान्य वर्गातील मुले या शाळेत शिक्षण घेत असून, त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून शाळेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली असून, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत शितल आवारे यांनी केले.
शारदा ढवण म्हणाल्या की, मुलांमधील क्षमता ओळखा. जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार महत्त्वाचे ठरतात. प्राथमिक शिक्षणातून जीवनाची पायाभरणी होते व माणूस जीवनात उभा राहतो. शहरात हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सक्षम पिढी घडविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिपाली बारस्कर यांनी मुलांनी किती व कोणत्या डिग्री मिळवल्या यापेक्षा त्यांच्यात संस्कार रुजवून आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. सर्व डिग्री घेतात मात्र आत्मविश्वास नसल्याने त्यांच्या हाती निराशा येते. यासाठी मुलांची आवड-निवड ओळखून प्रोत्साहन देण्याचे त्यांनी सांगितले. केंद्रप्रमुख पोपट धामणे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाचे कौतुक करुन शालेय शिक्षक व मुख्याध्यपकांचा विशेष सत्कार केला.
कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल आवारे यांनी केले. आभार सुरेखा वाघ यांनी मानले.