शाळेची रंगरंगोटी, स्वच्छतागृह व पेव्हिंग ब्लॉक बसवून विद्यार्थ्यांची केली सोय
सनफार्मा कंपनीचा दातृत्वाचा आदर्श प्रेरणादायी -अनिता काळे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेचे सनफार्मा कंपनीने रुप पालटले आहे. गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत रंगरंगोटी, स्वच्छतागृह बांधून व शाळेच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक बसवून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

शाळेची रंगरंगोटी, स्वच्छतागृह बांधून व पेव्हिंग ब्लॉक बसवून विद्यार्थ्यांची सोय करुन देण्यात आली. यावेळी कंपनीचे शाखा व्यवस्थापक हरीश बऱ्हाटे, एच.आर. प्रमुख दादासाहेब पाटील, स्टोर प्रमुख वैभव गांगुर्डे, सी.एस.आर. विभागाचे सोमनाथ दडस, एचआर श्रीनिवास न्यालपेल्ली, श्री अमृतवाहिणी संस्थेचे दिलीप गुंजाळ, सिराज शेख, मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, योगिता वाघमारे, अहिल्या सांगळे आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत परिसरातील कामगार वर्गातील व आर्थिक दुर्बल घटकातील पालकांची मुले शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून सर्वसामान्य वर्गातील पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत टाकले आहे. शहरालगत असलेली या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या दिवसंदिवस वाढत आहे. शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रसन्न वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सनफार्मा कंपनीने पुढाकार घेवून सीएसआर फंडातून काम पूर्ण केले.

भिंतींना रंगरंगोटी करुन आकर्षक चित्रे काढण्यात आली आहे, गंजलेल्या छताच्या पत्र्याला रंग देण्यात आला, खेळाचे मैदान सपाट करुन त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. स्वच्छतागृह बांधून मुला-मुलींची सोय करुन देण्यात आली आहे. या कामांमुळे शाळेला एक वेगळे रुप या प्राप्त झाले आहे. तीन महिन्यांच्या काळात शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये झालेले बदल सध्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अनुभवत असून समाधान व्यक्त करत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांनी सदरचे काम मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी सनफार्मा कंपनीकडे पाठपुरावा केला होता.
सनफार्मा कंपनीच्या माध्यमातून भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेचे रुप पालटले आहे. तर विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करुन दातृत्वाचा आदर्श निर्माण केला. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच चांगल्या भौतुक सुविधा निर्माण करुन देण्यास शिक्षकांना यश आले. . शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. मैदान चांगले करण्यात आल्याने विद्यार्थी विविध मैदानी खेळात सहभागी होत आहे. -अनिता काळे
सनफार्मा कंपनीच्या माध्यमातून अनेक शाळांना भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करुन देण्याचे कार्य सुरु आहे. गुणवत्तापूर्ण असलेल्या भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेची कामासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत या हेतूने या शाळेतील विविध कामे करुन देण्यात आली आहे. शाळेतून भीवी सक्षम पिढी घडणार आहे. -हरीश बऱ्हाटे (शाखा व्यवस्थापक, सनफार्मा)
