दिंडीतून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा रंगला होता. जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत बाल वारकऱ्यांचा शाळेत रिंगण सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी दिंडीतून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाचा संदेश दिला.

विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, मीराबाई, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. मुलांच्या हातात असलेल्या टाळ-मृदूंगचा निनाद, मुलींच्या डोक्यावर तुलशी वृंदावन, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करीत निघालेल्या दिंडीत उत्साह संचारला होता.
डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध, पायजमा, बंडी या पोशाखातील लहान मुले, तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन मुलीं दिंडीत सहभागी झाल्या होत्या. दिंडी पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ व शितल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पार पडला.

यावेळी अनुजा घुले, माधुरी चोथे, वर्षा कातोरे, सरला ढवण, सोमय्या शेख, संगीता भोईटे, पल्लवी भोईटे, ज्योती लाटे, अहिल्याबाई सांगळे, योगिता वाघमारे आदींसह पालक उपस्थित होते.
