शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सन्मान
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापके उल्हास पोपट दुगड यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले.
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ, गणित अध्यापक महामंडळाचे सल्लागार जनार्दन मुंढे, मच्छिंद्र वीर व गणित अध्यापक महामंडळाचे राज्य अध्यक्ष संजय निक्रड यांच्या हस्ते मुख्याध्यापक दुगड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष नवनाथ घुले, माध्यमिक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, कल्याण ठोंबरे आदींसह जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.
उल्हास दुगड हे 2015 पासून भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांनी विविध उपक्रमाद्वारे शाळेतील कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमाला चालना देण्याचे काम केले आहे. विविध क्षेत्रात शाळेचे गुणवंत विद्यार्थी चमकत आहे. सातत्याने गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कला, क्रीडा व शैक्षणिक स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी चमकले आहेत. तर जिल्ह्यात उज्वल निकालाची परंपरा त्यांनी कायम राखलेली आहे. या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच दुगड हे उत्कृष्ट खेळाडू असून त्यांनी राज्य राष्ट्रीय क्रीडा प्रकारात एकूण 29 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कास्य पदके पटकाविले आहेत. 2006 मध्ये मलेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार, राज्यशिक्षक पुरस्कार व पॅरोलैम्पिक संघटनेचा साफल्य हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, तसेच उपमुख्याध्यापक कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, कल्पना पाठक, वैभव कुलकर्णी व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.