देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ज्ञांचा गौरव
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षणावर भर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित ‘भारत भूषण सन्मान 2.0’ सोहळा शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशातील विविध राज्यांतील नामांकित शाळांचे प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ तसेच संस्थाचालकांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अद्यावत शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा सर्वांगीण विकास आणि मुलांमध्ये संस्कारमूल्यांची जोपासना या विषयांवर या सोहळ्यात विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व गणेश आरतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, प्रभावी योग प्रात्यक्षिक आणि ‘शिव गर्जना’ या सादरीकरणांनी उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण सभागृहात उत्साह, शिस्त आणि सांस्कृतिक रंगत अनुभवायला मिळाली. कार्यक्रमास शाळेचे संचालक संजय चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली.
चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव यांनी ‘भारत भूषण सन्मान’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला यंदाही देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. देशातील 175 विविध राष्ट्रीय पातळीवरील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञ या सोहळ्यास उपस्थित होते. विचारांची देवाण-घेवाण घडवून आणत शिक्षणाच्या माध्यमातून भारताला प्रगतीच्या दिशेने नेण्याची ही व्यापक संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले.
शैक्षणिक क्षेत्रातील प्राचीन परंपरा ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत झालेल्या प्रवासाचा आढावा यावेळी घेण्यात आला. पारंपरिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची गरज या मेळाव्यात अधोरेखित करण्यात आली. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या एमबीडी समूहाच्या प्रशिक्षण विभागातील उपमहाव्यवस्थापक रिती मल्होत्रा यांनी ग्रामीण भागापर्यंत अद्यावत शिक्षण प्रणाली पोहोचल्यास देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील नव्या डिजिटल साधनांचा शिक्षकांनी आत्मसात करणे काळाची गरज असून, शिक्षक प्रशिक्षण आणि सक्षम नेतृत्व हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष मान्यवर आराधना राणा यांनी “शाळांमध्ये परिवर्तन घडविणारे नेतृत्व” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. नेतृत्वामध्ये अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल” या विषयावर आयोजित परिसंवादाचे सूत्रसंचालन सीमा नेगी यांनी केले. या चर्चेत दीपिका नगरवाला, रिती मल्होत्रा, स्वाती पटेल, आणि कल्पेश राठोड यांनी सहभाग घेत शिक्षण क्षेत्रातील आधुनिक नेतृत्व, डिजिटल परिवर्तन आणि मूल्याधारित शिक्षण याविषयी सखोल विचार मांडले.
कार्यक्रमादरम्यान “एलिट प्रिन्सिपल क्लब”चे उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून देशभरातील शाळा प्रमुखांमध्ये संवाद, समन्वय आणि नवकल्पनांची देवाण-घेवाण वाढविण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची घोषणाही करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रभावी व ओजस्वी सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी श्रद्धा गोड आणि पायल राऊत यांनी केले. शेवटी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी आलिया खाटिक हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या सोहळ्यासाठी एमबीडी ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले.
