शाळेचा 100% निकाल; विद्यार्थ्यांनी पटकाविला विशेष योग्यता व प्रथम श्रेणीत येण्याचा मान
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा बाल प्रबोधनी, राष्ट्रभाषा प्राथमिक, राष्ट्रभाषा प्रवेशिका व राष्ट्रभाषा सुबोध या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेत शाळेचा 100 % निकाल लागला आहे. तर विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता व प्रथम श्रेणीमध्ये येण्याचा मान पटकाविला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रभाषा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक हबीब शेख यांनी मार्गदर्शन केले. ते मागील 29 वर्षापासून हिंदी विषयाचे मार्गदर्शन करतात. त्यांना अनेक हिंदी विषयातील पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच दरवर्षी विद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषा परीक्षेत बसवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यांना विद्यालयातील शिक्षक सतीश मुसळे यांनीही मदत केली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भानुदास कोतकर, संस्थेचे सचिव सचिन (आबा) कोतकर आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित घेण्यात आलेल्या भाग्योदय विद्यालय, भोयरे पठारचा निकाल पुढीलप्रमाणे:-
इयत्ता पाचवी बालबोधिनी एकूण 18 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी विशेष योग्यता श्रेणीमध्ये 10 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 6 विद्यार्थी, द्वितीय व तृतीय श्रेणीत प्रत्येकी एक विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
इयत्ता सहावीसाठी राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेसाठी एकूण 20 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, तर द्वितीय व तृतीय श्रेणीत प्रत्येकी 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
इयत्ता सातवी मधील 19 विद्यार्थी राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षेसाठी बसले होते. हे सर्व 19 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
तसेच इयत्ता आठवीच्या वर्गासाठी असलेल्या राष्ट्रभाषा सुबोध परीक्षेसाठी 31 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 4 विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीमध्ये, 26 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये व 1 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.