• Thu. Oct 16th, 2025

विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन अहिल्यानगर शाखेचे धरणे

ByMirror

Mar 12, 2025

लालटाकी येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखे समोर जोरदार निदर्शने

प्रगतीचे अभासी चित्र बँकेच्या हिताला बाधा आणणारे; ही प्रगती फक्त बँक प्रमुखांच्या कार्यकाळापुरती मेळ घालणारी असल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन अहिल्यानगर शाखेच्या वतीने महाराष्ट्र बँकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी बुधवारी (दि.12 मार्च) लालटाकी येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखे समोर धरणे आंदोलन करण्यात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे.


या आंदोलनात ऑर्गनायझेशन सेक्रेटरी प्रकाश कोटा, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, कार्यकारणी सदस्य वीरेंद्र भालसिंग, दत्ता म्याना, डिस्ट्रिक कॉर्डिनेशनचे अध्यक्ष कॉ. माणिक अडाणे, जनरल सेक्रेटरी कॉ. कांतीलाल वर्मा, कॉम्रेड गुजराती, महाराष्ट्र ग्रामीण बँक जनरल सेक्रेटरी सुजय नळे, हरिभाऊ गायकवाड, सचिन म्हसे, कॉ. उमाकांत कुलकर्णी, विनायक मेरगू, राहुल मोकाशी, योगेश सोन्नीस, विजय भोईटे, गणेश मेरगू, अमोल संत, भारतीय असुधानी, विजय साळवे, नाना उपाध्ये, कॉम्रेड नंदलाल जोशी, एन.डी. तांबडे, वाल्मीक बोर्डे, सुभाष गर्जे, गोरख चौधरी, दत्ता खडके, सुनील शिंदे, सचिन राहींज, संदीप सुद्रिक, सोमनाथ मैड, प्रवीण उल्हारे, दिलीप कापसे, गणेश चितळे, सोमनाथ वावरे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


20 फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया फेडरेशनचे सचिव कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापन प्रतिनिधी दरम्यान औद्योगिक संबंध विषयक बैठक झाली. या बैठकीदरम्यान व्यवस्थापन प्रतिनिधींनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर नकारात्मक व असंवेदनशील भूमिका कायम ठेवल्याने देशातील महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.


टेम्पररी (हंगामी)पीटीएस ना कायम घेऊन पीटीएसची भरती करावी, सबस्टाफ आणि लिपिक संवर्गात पुरेशी नोकर भरती करावी, कराराप्रमाणे विशेष सहाय्यक पदे भरावी, द्विपक्षीय संबंध पद्धतीची पुनर्स्थापना व्हावी, संघटना कार्यालये संघटनांना पुन्हा उपलब्ध करून द्यावे, डी-ज्यूरे कराराचे काटेकोर पालन करण्याची मागणी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या वतीने करण्यात आलेली आहे.


संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेली भूमिका तांत्रिकदृष्ट्या मान्य करण्यासारखी असली तरीही मागण्या मान्य न करण्यासाठी व्यवस्थापन प्रतिनिधींनी असमर्था व्यक्त केल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी विंडो ड्रेसिंग करून तसेच अनेक अनैतिक पद्धतीचा वापर करून आणि प्रोसिजरचे उल्लंघन करून ताळेबंद सजवला जात आहे. प्रगतीचे अभासी चित्र उभे केले जात आहे, तथापि हे चित्र टिकणारे नाही. कारण ते भ्रामक आहे, जे की बँकेच्या हिताला बाधा आणणारे आहे. कासा ठेवीमध्ये घट, किरकोळ एनपीएमध्ये वाढ आणि इतर काही बाबतीत काळजी करण्यासारखी परिस्थिती आकाराला येत असल्याचे धोके स्पष्ट करण्यात आले आहे.


तरतुदीमध्ये बदल करून बँक अल्पावधीत चांगला नफा दाखवू शकते, परंतु हे तात्पुरते असेल. हे धोरण सध्या बँक प्रमुखांच्या कार्यकाळापुरते मेळ घालणारे असेल. तरी या बँकेचे कर्मचारी म्हणून आपल्या संस्थेच्या दीर्घकालीन हिताचा संबंध आहे. ही सर्व वस्तुस्थिती प्रेक्षक म्हणून केवळ पाहू शकत नाही, म्हणूनच बँक ऑफ महाराष्ट्र कुठे घेऊन जाणार? हा प्रश्‍न उपस्थित करुन आंदोलन उभे करण्यात आलेले आहे. याविषयी संघटना म्हणून बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र संस्थेतील महत्त्वाचे घटक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी वेळ नसल्यामुळे हे मुद्दे सार्वजनिक रित्या उपस्थित करण्यात आल्याचे म्हंटले आहे.


या प्रमुख मुद्द्यांसाठी संघटनात्मक हस्तक्षेप करुन देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी सर्व झोनल ऑफिस समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. 17 मार्च रोजी मुख्य कार्यालय (लोकमंगल) समोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. तर 20 मार्च रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या हिताच्या मागणीसाठी सर्व संघटनांनी एकजुटीने येऊन लढा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *