पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार
मतपेटीला राखी बांधून विवेकशील मतदानाची नागरिकांना शपथ देणार
मतदान हे फक्त अधिकार नाही, ते आपल्या अंतरात्म्याचं पुकार -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाही सशक्त करण्याच्या उद्देशाने आणि सत्तापेंढारी यांना धडा शिकवण्यासाठी मतदान पेटी रक्षाबंधन ही संकल्पना अस्तित्वात उतरविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. लोकशाहीच्या संरक्षणाची राखी बांधण्याची अभिनव चळवळ उभारली जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
लोकशाही ही फक्त निवडणूक प्रक्रिया नसून, ती एक सजीव मूल्यप्रणाली आहे. तिच्या मुळाशी नीतिमूल्य, विवेक, जबाबदारी आणि समत्व. मात्र आजच्या काळात ही मूल्यप्रणाली जात, धर्म, पैसा, दबाव आणि भावनिक गुलामीच्या विळख्यात सापडत आहे. अशा वेळी मतदान पेटी रक्षाबंधन ही कल्पना केवळ प्रतिकात्मक नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या नवचैतन्याची घोषणा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदान पेटी ही एक निर्जीव पेटी नसून, ती आपली वैयक्तिक इच्छा, सामाजिक विवेक आणि भविष्याची बांधिलकी या सर्वांची प्रतीक आहे. तर मतदान हे फक्त अधिकार नाही, ते आपल्या अंतरात्म्याचं पुकार आहे. मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांच्या मते, काही वस्तू अर्चटाइप्स म्हणजेच सामूहिक अचेतनाच्या प्रतिमा होतात. ही पेटी देखील अशाच एका अर्चटाइपचं स्वरूप धारण करते नवसंविधान पेटी! आहे. या पेटीत टाकलेलं मत केवळ एक निर्णय नसतो, तर तो एक नवभारत घडवण्याचा करार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
राखी ही बहिण-भावाच्या नात्याची खूण आहे, पण त्याहून अधिक ती आहे कर्तव्य, निष्ठा आणि रक्षणाची शपथ आहे. जर ही राखी आपण मतदान पेटीला बांधली, तर ती एक भावनिक प्रतिज्ञा ठरते. मी माझं मत विवेकाने वापरेन. मी कोणत्याही भीती, दबाव वा मोहाच्या आहारी न जाता मतदान करीन. लोकशाही माझं नातं आहे, माझी राखी आहे. ही कृती केवळ प्रतिकात्मक नव्हे, तर राजकीय शिक्षणाचा भावनिक प्रारंभ ठरू शकणार असल्याचे म्हंटले आहे.
या चळवळीला फक्त एक विचार म्हणून मर्यादित न ठेवता सांस्कृतिक कार्यक्रमांशी जोडणं अत्यावश्यक आहे. शालेय स्तरावर पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, प्रतिकात्मक मतदान, लोकशाही शपथ देणे या कार्यक्रमाचा समावेश करता येऊ शकणार आहे.
रक्षाबंधन, प्रजासत्ताक दिन, संविधान दिन यावेळी मतदान पेटी राखी उपक्रम राबवून समाजात जागृकता निर्माण केली जाणार आहे. प्रतिकात्मक मतपेटी घेऊन प्रत्येक शाळा, गाव, महाविद्यालयात राखी बांधून शपथ देणे, मी माझं मत कधीही विकणार नाही. मी विवेकाने मतदान करेन ही लोकशाही शपथ देऊन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.