देवळाली प्रवरेच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात; दुर्गंधी, रोगराई आणि मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला
प्रशासन गप्प, ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या हद्दीत नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत पोल्ट्री फार्म बंद करण्याची जोरदार मागणी बहुजन समाज पार्टी व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांना निवेदन देण्यात आले असून, जर त्वरित कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे, राहुरी तालुका अध्यक्ष संजय संसारे, महासचिव कैलास तोडगे, तालुका प्रतिनिधी अशोक तांबे, शहानवाझ शेख, अनिकेत कडू आदी उपस्थित होते.
नगर परिषदेच्या हद्दीत गेल्या काही काळात अनेक पोल्ट्री फार्म अनधिकृतरित्या सुरू करण्यात आले आहेत. या फार्मना प्रशासनाची कोणतीही मान्यता नाही, तरीही स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, घाण, रोगराईचा प्रसार झाला आहे. मृत पक्षी आणि पोल्ट्रीमधील घाण अनियमितपणे टाकल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे कुत्रे नागरिकांवर हल्ले करत असून, बालकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घाणीमुळे परिसरात माशा व डास वाढले असून, त्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. अनेक नागरिक आजारी पडत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी नगर परिषद, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय तसेच राहुरी पोलीस स्टेशन येथे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोल्ट्री फार्म तत्काळ व कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करत, संबंधित मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.