अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध
केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन बहुजन समाजाची माफी मागण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि.24 डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व बहुजन समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, राजू खरात, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, उत्तर जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे, सलीम अत्तार, राहुरी विधानसभेचे अध्यक्ष संजय संसारे, सुनील मगर, मच्छिंद्र ढोकणे, आकाश शेंडे, विठ्ठल गालफाडे, अण्णासाहेब धाकतोडे, चंद्रकांत लोंढे, श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष जाकीर शेख, श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष नितीन जावळे, जाकीर शहा, किरण भोसले, कचरू लष्करे, दिलीप सदाशिव, कैलास कोळगे, राहुरी महासचिव रामभाऊ लष्करे, सलीम अत्तार, भीमराव घोडके, अंबादास घोडके, शहर प्रभारी गणेश बागल, रवी कुमार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या पवित्र संसदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. यामुळे देशातील बहुजन समाजासह संविधानाला मानणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. बाबासाहेब हे सर्व बहुजनांचे व उपेक्षित वर्गाचे मुक्ती दाते असून, त्यांनी 5 हजार वर्षे गुलामीत जगणाऱ्या समाजाला गुलामीतून बाहेर काढले. ते सर्व बहुजनांसाठी दैवताप्रमाणे असून, त्यांचा झालेला अवमान सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना देण्यात आले.