धर्मांधशक्तीला रोखण्यासाठी सर्व समाजाचा साथ व विकासाचा नारा
संविधान, आरक्षण विरोधी व धर्मांधशक्तींना रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टीचा पर्याय -उमाशंकर यादव
नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार उमाशंकर यादव यांच्या प्रचाराचा प्रारंभ शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन करण्यात आला. धर्मांधशक्तीला रोखण्यासाठी सर्व समाजाचा साथ व विकासाचा नारा देऊन प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीत बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रारंभी मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माळीवाडा येथील महात्मा फुले व जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. तर शहरातून प्रचार फेरीसह बाईक रॅला काढण्यात आली. तर सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रचार रॅलीत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे, रवी कुमार, गणेश बागल, नगर शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, नितीन जावळे, सुनील चव्हाण, विकास बाबर, हौसराव गोरे, अंबादास घोडके, नगर विधानसभेचे शमीम शेख, विकास कुमार, रामजीत यादव, अजित यादव, मधुरंजन यादव, गणेश यादव, शैलेश कोरी, सुरज यादव, अन्वर शेख, सुभाष यादव, विशाल यादव, कैलास कोरी, मनटू यादव, गोलू यादव, अमजद शेख, मनीषा जाधव, विशाल पवार, अनिल विधाटे, संतोष मोरे, बाळासाहेब मधे, सोहन सिंग, बोला सिंग आदी सहभागी झाले होते.

जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ म्हणाले की, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना जनतेमधून प्रतिसाद मिळत आहे. आलटून-पालटून निवडून आलेल्यांनी विकास साधला नाही. अमिष दाखवून दहशतीने सत्ता काबीज केली. दलित, आदिवासी व मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. मात्र त्यांच्या संकटकाळात त्यांच्या बाजूने उभे राहिले नाही. या समाजाला वारंवार टार्गेट केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ बोर्डच्या प्रश्नावर शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) खासदार वॉक आऊट करतात, भाजपचे आमदार नितेश राणे शहरात येऊन मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांच्या मुळाबाळांना घरात घुसून मारण्याची भाषा करतात, जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल गैरउद्गार काढले जातात, या विरोधात देखील भूमिका घेतली जात नाही. अशा प्रवृत्तींना लढा देण्यासाठी बहुजन समाज पक्ष ताकतीने निवडणुकीच्या मैदानात उतरला असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवार उमाशंकर यादव म्हणाले की, समतेचा संदेश घेऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे कार्य बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून केले जाणार आहे. शहराचा विकास, उद्योगधंद्यांना चालना, दहशतमुक्त करुन युवकांच्या रोजगाराला चालना व कामगारांचे प्रश्न सोडवून शहराचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर संविधान, आरक्षण विरोधी व धर्मांधशक्तींना रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टी पर्याय म्हणून असल्याचे स्पष्ट केले.
शहानवाज शेख यांनी मुस्लिम समाजासह आदिवासी, दलित व संपूर्ण ओबीसी समाज बहुजन समाज पार्टीशी एकवटणार आहे. अन्यायाची परिसीमा ओलांडण्यात आली असून, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पायउतार होणार असल्याचे सांगितले. राजू शिंदे म्हणाले की, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार निवडून आल्यास ते बेरोजगार युवक, भूमीहीन, माजी सैनिक व महिलांच्या प्रश्नावर प्राधान्याने काम करतील असा विश्वास व्यक्त केला.