घोटळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने
अहमदनगर (प्रतिनिधी)- नीट परीक्षेत घोटळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी व विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता पुन्हा परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी निदर्शने केली.
या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, उत्तर जिल्हाध्यक्ष गणपत मोरे, राम मगरे, रमेश सूर्यनारायण, सुरेश निकाळजे, जामखेड तालुकाध्यक्ष परमेश्वर मोरे, अजिनाथ मोरे, युवक जिल्हाध्यक्ष विनोद शिरसाठ, संजय शिंदे, प्रकाश लोंढे, रोहिदास मोरे, मनोहर शिंदे , मोहन शिरसाठ, डॉ. भास्कर रणनवरे, एस.के. सोनवणे, प्रतीक बारसे आदी सहभागी झाले होते.

5 मे 2024 रोजी एनटीएच्या वतीने घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी व गोंधळ झाला आहे. याप्रकरणी अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून, अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणात पटणा येथील 13 आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नीटचे पेपर पूर्वनियोजित पध्दतीने परीक्षापूर्वी फोडण्यात आले आहे. उच्चस्तरा पर्यंत हा घोटाळा झाला असून, यामध्ये अनेकांचा सहभाग आहे. युवकांचा भविष्य उध्वस्त करणारा व भविष्याच्या दृष्टीने गंभीर प्रकार घडला आहे. अनेक विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळाल्याने अधिकचे गुण देण्यात आले. तर एकाच सेंटर मधील 6 विद्यार्थी टॉपर ठरले आहे. रेकॉर्ड ब्रेक 67 विद्यार्थ्यांनी देशात टॉप केले. तर काहींना मिळालेल्या गुणांवरुन यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे सिध्द होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नीट परीक्षा सरकारी यंत्रणेच्या देखरेखीत व्हावी, ज्या विद्यार्थ्यांनी नीट मध्ये फसवणुक करुन गुण मिळवले त्यांना यापुढील परीक्षेत बसण्यास प्रतिबंध करावा, नीट परीक्षा घोटाळ्यातील संबंधित अधिकारी, संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले.
