• Wed. Feb 25th, 2026

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार

ByMirror

Feb 24, 2026

बोडखे हे शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व – चेअरमन आप्पासाहेब शिंदे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे यांची नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे.


बाबासाहेब बोडखे हे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक असून, संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिक्षकांच्या वेतन, सेवा अटी, बदली, निवृत्तीवेतन आदी प्रश्‍नांवर त्यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीनिमित्त सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके यांच्या हस्ते बोडखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बबन शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक उमेश गुंजाळ, महेंद्र हिंगे, सुनिल दानवे, छबुराव फुंदे, किशोर धुमाळ, प्रा. शिरीष टेकाडे, राजेंद्र कोतकर, विजय पठारे, शिवाजी लवांडे, सचिव स्वप्नील इथापे आदी मान्यवर उपस्थित होते.


चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, बाबासाहेब बोडखे यांनी शिक्षकांच्या प्रश्‍नांवर सातत्याने भूमिका मांडून संघटनात्मक ताकद वाढवली आहे. झालेली नियुक्ती ही त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांनी केवळ पदासाठी नव्हे, तर शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली अोळख निर्मान केली. अनेक वेळा प्रशासनाच्या दारात ठामपणे उभे राहून त्यांनी शिक्षकांचे प्रश्‍न मांडले आणि त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामीण भागातील शिक्षकांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


तसेच जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड झालेल्या बबन शिंदे यांचेही अभिनंदन करुन, संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी ते उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *