नाशिक विभागीय सहविचार सभेत निर्णय
शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या व गरजू विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या नेतृत्वाचा गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नाशिक विभागीय सहविचार सभेत शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा कोषाध्यक्षपदी बबन शिंदे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत प्रसाद सामलेटी यांची शहराध्यक्षपदी व हिंद सेवा मंडळाच्या पतपेढीचे चेअरमन प्रा. दिपक आरडे यांची शहर सचिवपदी यांची देखील नियुक्ती करण्यात आली. ही सहविचार सभा शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. सुनिल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला विभागाचे अध्यक्ष प्रा. शरद दळवी, प्रा. सुनिल सुसरे, सचिव प्रा. शिवाजी घाडगे, बबन शिंदे, अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ घुले, घनश्याम सानप, सचिन गावडे, संचालक नितीन केने यांच्यासह अनेक शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात शिक्षकांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
बाबासाहेब बोडखे गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शासनस्तरावर शिक्षकांच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शिक्षक चळवळीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत बोडखे यांनी दिव्यांग व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक चळवळीला बळकटी देण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, या सर्व कार्याची दखल घेत त्यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बबन शिंदे, प्रसाद सामलेटी व प्रा. दिपक आरडे यांची शैक्षणिक चळवळीतील कार्याची दखल घेऊन अनुक्रमे जिल्हा कोषाध्यक्ष, शहराध्यक्ष व सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून सदर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
