आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन व स्माईल फाउंडेशनचा उपक्रम
आहार, व्यायाम व आरोग्यसंपन्न जीवनशैलीबाबत मार्गदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील डोंगरगण व शहरातील लांडे स्थळ येथे गरोदर महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन व स्माईल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात गरोदर महिला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य व सकस आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. डॉ. सौरभ भापकर यांनी महिलांना दैनंदिन जीवनात सहज उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थातून पोषण कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः स्तनदा माता व गरोदर माता यांच्या आहार नियोजनाविषयी महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली.
डॉ सौरभ भापकर यांनी मातांसाठी आवश्यक अन्नघटक, फळे-भाज्या व प्रथिनांचे महत्त्व यावर भाष्य केले व विद्यार्थ्यांना सकस आहार, व्यायाम व आरोग्यसंपन्न जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपला आहार संतुलित ठेवणे किती आवश्यक आहे याची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या आहाराचे नियोजन कसे करावे, जेणेकरून शरीराला आवश्यक जीवनसत्वे व ऊर्जा मिळू शकेल, याचेही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी अंगणवाडी सेविका सविता मुत्त्याल, ज्ञानेश्वर चेडे सर उपस्थित होते.