शहरातील महापालिकेच्या शाळा राज्यासाठी मॉडेल म्हणून विकसीत करणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील गुणवंत शिक्षकांना सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सावेडी येथील माऊली संकुल मध्ये मनपाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, मुख्य लेखाधिकारी सचिन धस, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे, पारुनाथ ढोकळे, शिवाजी लंके, भाऊसाहेब कबाडी, विद्या दगडे, अन्सार शेख, मंदा हंडे, विद्या वाघमारे सर्व समित्या अध्यक्ष, सदस्य व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सावेडी येथील समर्थ विद्या मंदिर प्राथमिकच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकात प्रशासन अधिकारी जुबेर पठाण यांनी मागील वर्षी पाच व या वर्षीचे तीन असे एकूण आठ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आजही शिक्षकांना समाजात मान-सन्मान आहे. समाज घडविण्याचे काम शिक्षक करत आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार करून, अद्यावत डिजिटल शिक्षण प्रणालीने शिक्षक मुलांना घडविण्याचे काम करण्याचे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना, नवीन शैक्षणिक प्रणाली आत्मसात करावी लागणार आहे. महापालिकेच्या शाळांचा विकास करण्यासाठी तज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने विकास आराखडा तयार करुन दिल्यास भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. तर शहरातील महापालिकेच्या शाळा राज्यासाठी मॉडेल म्हणून विकसीत करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. पुरस्काराने जबाबदारी व काम वाढते. चांगले काम करणाऱ्यांना अडचणी येतात, डगमगू नका. चांगले काम करण्याचे सातत्य ठेवा. जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात. सर व मॅडम हे जबाबदारीचे नाव समाजात प्रचलित असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार म्हणाले की, शिक्षण पद्धतीत मोठा बदल झाला आहे. सध्याच्या मुलांची बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढली आहे. मुलांच्या प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी शिक्षकांना देखील प्रचंड अभ्यास करावा लागणार असल्याचे सांगून, त्यांनी शिक्षक व विद्यार्थींचे प्रेम, जिव्हाळ्याचे संबंध उलगडून सांगितले. मुख्य लेखाधिकारी सचिन धस यांनी शिक्षकांचे जे संस्कार होतात ते कायमस्वरूपी आठवणीत राहतात. शिक्षकांची भूमिका त्यांनी आपल्या विनोदी शैलीतून व्यक्त केली. तर जेंव्हा समाजात शिक्षकांना सर्वोच्च मानाचा आदर मिळेल तेंव्हा समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपायुक्त विजयकुमार मुंडे म्हणाले की, एकत्र कुटुंब पद्धती कमी झाल्याने मुलांचा विकास खुंटला आहे. शिक्षकांप्रमाणे पालकांना देखील मुलांना घडविण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे. समाजाला दिशा देण्याची शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पर्यावरणाच्या कोपापासून वाचण्यासाठी भावी पिढीला पर्यावरण संरक्षणाचे धडे शाळेतून द्यावे लागणार आहे.
शालेय शिक्षणातून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घ्यावी लागेल. पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आजच्या पिढीने पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर महापालिकेचा शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरु करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सीमा म्हस्के यांनी पुरस्कार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पवार व गितांजली शेरकर यांनी केले. आभार शेखर उंडे यांनी मानले.
महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शिक्षक:-
विद्या महेश पोतदार, वृषाली प्रसाद कुलकर्णी, विमल संजय कानडे, सतीश सुखदेव मेढे, सिमा शिवाजी म्हस्के, संगिता प्रविण साळवी, मंगला सुदामगीर गोसावी, शारदा शरद काळे.
