स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम
निमगाव वाघात रंगले काव्य संमेलन
स्वामी विवेकानंदांच्या विचाराने युवकांनी हिंदू धर्म आत्मसात करण्याची गरज -ज्ञानदेव पांडुळे
नगर (प्रतिनिधी)- कुठलाही द्वेष व हिंसा न करणारा हिंदू धर्म आहे. अंधश्रद्धा न बाळगणारा व अध्यात्माने पुढे जाणारा आपला धर्म आहे. स्वामी विवेकानंदांनी खरी हिंदू धर्माची व्याख्या जगासमोर आणली. त्यांच्या विचाराने युवकांनी हिंदू धर्म आत्मसात करण्याची गरज आहे. राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. हा प्रेरणादायी इतिहास युवकांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे यांनी व्यक्त केले.

निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.12 जानेवारी) राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित सातवे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी पांडुळे बोलत होते. परिवार मंगल कार्यालयात झालेल्या काव्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदेव लंके, काव्य संमेलनाच्या अध्यक्षा अनिता काळे, कार्याध्यक्षा कवयित्री सरोज आल्हाट, संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचयात सदस्य पै. नाना डोंगरे, गझलकार रज्जाक शेख, कवी गीताराम नरवडे, आनंदराव साळवे, कल्पना दबडे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदींसह आदींसह कवी, साहित्यिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे पांडुळे म्हणाले की, वास्तववादी काव्य व साहित्य समाजाला दिशा देण्याचे काम करत असते. ते दीपस्तंभाप्रमाणे तेवत राहते. कवी, शाहिरांनी स्वराज्य स्थापनेपासून, स्वातंत्र्य संग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान दिलेले आहे. समाजातील प्रश्न मांडून सर्वसामान्यांना जागृत करण्याचे काम कवी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव लंके म्हणाले की, समाजाचे प्रतिबिंब काव्य व साहित्यातून उमटत असते. समाजाला दिशा देवून नेतृत्व निर्माण करण्याचे काम साहित्य करत असते. या संस्था दरवर्षी काव्य संमेलन घेऊन ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजवण्याचे काम करत आहे. तर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देवून सामाजिक चळवळीला बळ देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कवयित्री सरोज आल्हाट यांनी दरवर्षी कवितेचा उत्सवातून सामाजिक चळवळीचा जागर करण्याचे काम सुरु आहे. कविता हा साहित्याचा गाभा आहे. जीवनाचे प्रत्येक पैलू कवितेमधून उमटत असतात. कविता भावना प्रकट करून जगायला शिकवते व नैराश्यातून बाहेर काढत असल्याचे त्यांनी सांगितले.
या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी व नवोदित कवींनी आपल्या काव्यातून समाजातील वास्तवतेचे दर्शन घडवून विविध प्रश्न व सामाजिक विषयांवर जागृती केली. तर विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी पुरस्काराने गौरव करण्यात आला.
काव्य संमेलनात कवी गीताराम नरवडे यांनी बाई माझ्या पोराने करामत केली…., काल माझ्या घरात नवीन सुनबाई आली! या काव्याने संपूर्ण सभागृहाला खिळवून ठेवले. कवयित्री सरोज आल्हाट यांनी माझ्या कविते तू अशीच जगत रहा…, ह्रद्याच्या लेखणीतून उमटताना शब्दांना जपूनच कवटाळून रहा! या काव्याचे सादरीकरण केले. गझलकार रज्जाक शेख यांनी सादर केलेल्या आता तो पूर्वी सारखा वागत नाही…. या कवीतेने प्रेम मनाचा ठाव घेतला.
कपाली टिकली इवलीशी लावले…, लचकत मुरडत वाट्याने चालते! अशा विविध कवितांचे सादरीकरण करण्यात आले. बाल शाहीर ओवी काळे हिने सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कवितांना श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव लंके गुरुजी यांना जीवन गौरव, सौ. शकुंतला लंके यांना राजमाता जिजाऊ नारी शक्ती, तर माजी प्राचार्य सुभानजी खैरे यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भागचंद जाधव, दिलावर शेख, विकास निकम, अतुल फलके, मयुर काळे, राजू जाधव आदी उपस्थित होते. या काव्य संमेलनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरु युवा केंद्राचे सहकार्य लाभले.
–
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त यांचा झाला पुरस्काराने सन्मान:-
टी.एस. उर्फ बाळासाहेब देशमुख (श्रीगोंदा), अमोल बास्कर (नगर), गिरीजा भुमरे (संभाजीनगर), अहमद पीरसहाब शेख (हिंगोली), हेमलता पाटील (नगर), कल्पना दबडे (सांगली), मुख्याध्यापक रंगनाथ सुंबे (चास), सविता शिंदे (शेवगाव), प्राचार्या अनुरिता झगडे (नगर) सुहास देवराज (जळगाव), हिराबाई गोरखे (श्रीगोंदा), अरुणा देवराज (जळगाव), हेमलता गीते (नगर), सरोज आल्हाट (नगर), सुनिता दहातोंडे (नेवासा), चंद्रकांत सांगळे (श्रीगोंदा), विजया पाटील (जळगाव), फारुक शेख (बुलढाणा), मोहंमद रफीक शेर मोहंमद (बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), विजय आरोटे (नगर), अनंत कराड (बीड), मंदाबाई तरटे (श्रीगोंदा), अशोक भालके (नेवासा), ओवी काळे (श्रीरामपूर), अविनाश साठे (नगर).
–