उत्स्फूर्त प्रतिसादाने महिलांनी लुटला विविध खेळांचा आनंद
पैठणीसह महिलांनी पटकाविले विविध बक्षिसे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावच्या भूषणनगरमध्ये महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरचा कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता. महिला दिनाच्या औचित्य साधून फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगलेला हा खेळ पैठणीचा कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी विविध खेळाचा आनंद लुटला. पैठणी, खण साडी, नथसह महिलांनी विविध बक्षिसे पटकाविली.
मोनिका कुसळकर यांच्या संकल्पनेतून भूषणनगरच्या गणपती मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा रंगला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुवर्णा राजेंद्र पठारे व अनिता महेंद्र शर्मा उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी परिसरातील महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

प्रारंभी फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थिनींनी व त्यांच्या पालकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन स्त्री शक्तीचे विविध रुपांमधून दर्शन घडविले. तर महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व महिलांनी बाईपण भारी देवा… या गीतावर ठेका धरला होता.

मोनिका कुसळकर म्हणाल्या की, प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. या कार्यक्रमातून तिच्या कलागुण वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात शिवानी शिंगवी यांनी महिलांसाठी विविध खेळाच्या फेऱ्या घेतल्या. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. यामध्ये विविध खेळांचे फेऱ्या पार पडल्या. विविध स्पर्धेचे टप्पे पार करुन महिलांनी बक्षिसांची लयलुट केली. यामध्ये विजेत्या ठरलेल्या प्रांजली ओस्तवाल पैठणी बक्षिसाच्या मानकरी ठरल्या.

द्वितीय बक्षिस विजया ढमाले यांना खण साडी तर तृतीय विजेत्या शीतल घोडके यांना चांदीचे नाणे बक्षीस देण्यात आले. तसेच सोडत पद्धतीने तीन भाग्यवान महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात आले. या सोहळ्यासाठी विजय पठारे, शिवप्रताप तरुण मित्र मंडळ व मानवता फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.
