प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा रंगला कार्यक्रम; विविध स्पर्धांचा महिलांनी लुटला आनंद
संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जातो -अलकाताई मुंदडा
नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मराठी संस्कृतीचा जागर करुन पारंपारिक पध्दतीने हळदी-कुंकूचा कार्यक्रम पार पडला. पारंपारिक वेशभूषेत महिला उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा महिलांनी आनंद लुटला.
सारसनगर येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या सभामंडपात पार्वती (काकी) जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला होता. यावेळी गीता पर्वते, योगिता पर्वते, अहिल्या पर्वते, एकता पर्वते, मनिषा पर्वते, आरती भुतडा, सुरेखा भोसले, छाया राजपूत, प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, उषा सोनी, प्रतिभा भिसे, अनिता काळे, मिरा पोफलिया, सीमा बंग, पुष्पा मालू, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, रेखा फिरोदिया, हिरा शहापुरे, ज्योती गांधी, हेमा पडोळे, उषा सोनटक्के आदींसह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. रजनी भंडारी यांनी फक्त हळदी-कुंकूचा कार्यक्रम न करता महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून, ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीन विकासावर वर्षभर भर दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या.
पार्वती (काकी) जगताप म्हणाल्या की, संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जात आहे. कार्यक्रमात एकत्र येताना महिला संस्कार व संस्कृतीचा जागर करत असून, त्यांच्यामुळे संस्कारी पिढी घडत असल्याचे त्यांनी सांगितले. गीता पर्वते म्हणाल्या की, महिलांनी आपल्या संस्कृती जोपासून वाटचाल केल्यास भविष्यातील प्रश्नांना सामोरे जाता येणार आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाने युवा पिढीचे भवितव्य धोक्यात असून, यावर भावी पिढीला संस्काराने मात करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजन, कौशल्यात्मक व बौध्दिक स्पर्धा रंगल्या होत्या. दिपा मालू यांनी विविध स्पर्धा घेतल्या. विजेत्या महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. बक्षीसांसाठी सिमा बंग, पुष्पा मालू, मिरा पोफलिया, छाया राजपूत, विठ्ठल भुतडा यांचे प्रायोजकत्व लाभले.
पर्वते परिवाराच्या वतीने महिलांना उन्हाळ्यानिमित्त पाण्याचे बॉटल वाण म्हणून देण्यात आले. रजनी भंडारी यांच्या वतीने सर्व महिलांना स्नेह भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी लोढा यांनी केले. आभार अरुणा गोयल यांनी मानले.