• Sat. Feb 21st, 2026

नवीन कराराबाबत अवतार मेहेर बाबा कामगार युनियनची बैठक

ByMirror

Jan 6, 2026

“प्रसाद नको, जगण्यासाठी वेतन हवे!” कामगारांच्या ठाम घोषणा


जुने कामगारांच्या कुटुंबीयांना प्राधान्य देण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियनची महत्त्वपूर्ण बैठक अरणगाव येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत अवतार मेहेर बाबा ट्रस्ट आणि कामगार यांच्यात होणाऱ्या नवीन कराराबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. वाढती महागाई, अपुरा पगार आणि कामगारांचे भवितव्य यासह विविध मुद्द्यांवर कामगारांनी भूमिका मांडली.


बैठकीदरम्यान नवीन कामगार भरती करताना वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या जुन्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्राधान्य देण्यात यावे, अशी ठोस मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली. यावेळी कामगारांनी “प्रसाद नको, जगण्यासाठी वेतन हवे!” अशा जोरदार घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.


भाकपचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याप्रसंगी लाल बावटा जिल्हा सचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, अवतार मेहेर बाबा कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, तसेच संजय कांबळे, विजय भोसले, राधाकृष्ण कांबळे, सुनिल दळवी, राजेंद्र मोरे, चंद्रकला देशमुख, श्रीनाथ पाटोळे, सुभाष शिंदे, प्रविण भिंगारदिवे, गणेश गहिले, सुनिता जावळे, रामदास कल्हापूरे, दिगंबर माने आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.


यावेळी बोलताना कॉ. ॲड. सुभाष लांडे म्हणाले की, सर्व कामगारांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या हिताच्या सर्व मागण्यांचा डिमांड नोटीसमध्ये समावेश करण्यात येईल. सध्या वाढत्या महागाईमुळे कामगारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून, नवीन करारात कुटुंब चालेल अशा पद्धतीने वेतनवाढ देणे अत्यंत गरजेचे आहे. कामगारांच्या मागणीनुसारच करार करण्यात येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


कॉ. ॲड. सुधीर टोकेकर यांनी स्पष्ट केले की, संस्थेच्या उभारणीत जुन्या कामगारांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कष्टावरच अवतार मेहेर बाबा ट्रस्टचा पाया उभा आहे. मात्र, वर्षानुवर्षे राबणारे कामगार आजही अनेक हक्कांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना नोकरीत प्राधान्य देणे आणि सन्मानाने जगता येईल असा वाढीव पगार देणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.


प्रास्ताविकात सतीश पवार यांनी सांगितले की, ट्रस्टच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचा सन्मान आणि रोजगारातील स्थैर्य युनियनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. युनियनच्या माध्यमातून अनेक समस्या मार्गी लागल्या असून, कामगारांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. एकजुटीने लढा दिल्यास होणारा नवीन करार नक्कीच कामगारांच्या हिताचा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीत पाहुण्यांचे स्वागत विजय भोसले यांनी केले. आभार संजय कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *