माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने सादर केले द्वापारयुग आणि कलियुगातील नारी शक्तीचे विविध रूप
योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय जीवनाचा कायापालट करतात -डॉ. मेहेरनोश मेहता
नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगातील स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविण्यात आले. पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाने सत्ययुग आणि त्रेतायुग, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी द्वापारयुग आणि कलियुगातील नारी शक्तीचे विविध रूप उलगडले. नारी सतयुग से कलियुग तक! या संकल्पनेवर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आय.एम.एस. सीडीआर महाविद्यालयाचे संचालक डॉ. मेहेरनोश मेहता यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करुन दीपप्रज्वलनाने झाले. संस्थेच्या डॉ.आर.बी. मोने कला मंदिरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, सल्लागार भूषण भंडारी, विश्वस्त सुनंदा भालेराव, आशाताई फिरोदिया, पुष्पा फिरोदिया, सुनीता मुथा, विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख अश्विनी रायजादे, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख कांचन कुमार, विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन दुबेपाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी शाल्मली तरवडे आदींसह सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, शाळेचा स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. या आठवणी जीवनभर मनात कोरल्या जातात. विविध क्षेत्रात यश मिळवताना पाठीवरती मिळालेली कौतुकाची थाप प्रेरणा देत राहते. शालेय जीवन आयुष्याचा अमूल्य ठेवा असून, विद्यार्थ्यांनी जबाबदारीने वागावे. तुमच्या जीवनाचे तुम्हीच शिल्पकार असल्याचे सांगून, त्यांनी मुलांच्या आवडीनिवडीनुसार शिक्षकांच्या मार्गदर्शनाने भविष्यातील वाटा निवडण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे पालकांना आवाहन केले.
प्रारंभी प्राथमिक विभागाच्या संगीत अध्यापिका सुवर्णा मलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बहारदार स्वागत गीत सादर करुन पाहुण्यांचे स्वागत केले. मोहित रंगलानी व राजनंदिनी त्रिंबके या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे डॉ. मेहेरनोश मेहता यांच्या मुलाखतीद्वारे यशाचा कानमंत्र जाणून घेतला. तर आय.एम.एस. सीडीआर महाविद्यालयातील विविध शिक्षणाच्या संधी व करियरच्या वाटेबद्दल माहिती जाणून घेतली. ऍडमिनिस्ट्रेटिव्हची जबाबदारी सांभाळताना निर्माण होणारे प्रश्न, दैनंदिन दिनचर्या, कामाचे नियोजन आदी प्रश्नांवर डॉ. मेहता यांना विद्यार्थ्यांनी बोलते केले.
डॉ. मेहेरनोश मेहता म्हणाले की, जीवनात वाचन महत्त्वाचे आहे. वाचनाने प्रेरणा व यशाचा मार्ग सापडतो. सध्याची पिढी वाचनापासून दुरावल्याने भरकटत आहे. शिक्षणाबरोबरच कौशल्यक्षम शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्या दिशेने जाण्याची गरज आहे. कठोर परिश्रम व शिक्षणाने मिळालेले ज्ञान जीवनाच्या यशाकडे घेऊन जातात. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय जीवनाचा कायापालट करतात. दहावी नंतरचे दोन-तीन वर्ष जीवनाची दिशा बदलून टाकतात. त्यासाठी योग्य निर्णय घेण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तर या शाळेत इयत्ता अकरावीचे शिक्षण घेताना महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या वतीने डॉ. मेहता यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये शाळांतर्गत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. यादी वाचन जान्हवी फुलसौंदर व स्वराली शिंदे यांनी केले.
गणेश वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. स्त्री निर्मित ब्रह्मा, विष्णू, महेशाचे सादरीकरण नमस्तुते परमशक्तीद्वारे दाखविण्यात आले. तर शक्ती पिठाचे दर्शन घडवित महिषासुर मर्दिनीचे रुपाचे साक्षात्कार विद्यार्थ्यांनी घडविले. चलो बुलावा आया है!…. या गीताने वातावरण भक्तीमय बनले होते. कंसाचा अत्याचार…, देवकी यशोदा यांना अपत्य प्राप्तीतून झालेला श्रीकृष्ण जन्म…. श्रीकृष्ण लीलेतून द्वापारयुगात विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना घेऊन गेले. गांधारी, कुंती, द्रोपदी यांचे पात्र साकारण्यात आले होते. या कार्यक्रमातून भक्तीची ज्योत पेटवण्यात आली.
तर कलयुगातील स्त्री शक्तीचे दर्शन घडविताना संत मीराबाई, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ पासून ते सिंधूताई सपकाळ पर्यंतच्या कर्तृत्ववान महिलांचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे घडविण्यात आले. सत्ययुगापासून ते कलियुग पर्यंत स्त्रीच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का नांगरे व सारा शेख या विद्यार्थ्यांनी केले. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी देशमुख आणि ओवी सातपुते यांनी केले. आभार उत्कर्ष देशमुख व इरा कुलकर्णी यांनी मानले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
