17 शाळांचा सहभाग; सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटची शांभवी शर्मा प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. या वर्षी अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलने स्पर्धेचा सांघिक फिरता करंडक पटकाविला.
दरवर्षी घेतली जाणारी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे. स्पर्धकांना ऐन वेळेस विषय देऊन त्यावर विचार मांडण्यास सांगण्यात आले होते. अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या सभागृहात प्रारंभी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परीक्षक सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिरीष जाधव व प्रमुख पाहुणे अहमदनगर ज्युनिअर कॉलेजच्या अध्यापिका मार्शनिल स्वामी उपस्थित होत्या. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख कांचन कुमार उपस्थित होत्या. शाळेच्या विद्यार्थिनीनी समूहगीताने पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांना शाळेच्या शिक्षिका सुवर्णा मलमकर यांचे मार्गदर्शन लाभले.
शिरीष जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेला न घाबरता सामोरे जावे. अडचणीपेक्षा स्वप्ने मोठी असतात, तेव्हा विद्यार्थ्यांनी स्वप्ने पहावीत व त्याप्रमाणे वाटचाल करुन कष्टाने ती पूर्ण करण्याचे आवाहन केले.
मार्शनिल स्वामी म्हणाल्या की, स्पर्धेचे जग आहे. विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या स्पर्धेत उतरले पाहिजे. स्पर्धेत उतरलेल्या क्षेत्राची परिपूर्ण माहिती घेऊन नियम पाळण्याचे सांगून, दरवर्षी विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले.
पाहुण्यांचा परिचय रुबीना शेख व आसिफ शेख यांनी करुन दिला. स्पर्धेचे नियम आणि अटी विद्या यादव यांनी स्पर्धकांना समजवून सांगितले. वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन मनिष कांबळे व कल्पना लोंढे यांनी केले. सकाळच्या सत्रात वक्तृत्व स्पर्धा रंगली होती. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर मनमोकळे आपल्या भावना मांडल्या.
स्पर्धा संपल्यावर निकाल जाहीर करुन बक्षिस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत 17 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम- शांभवी अभिजीत शर्मा (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट), द्वितीय- लेविया प्रशांत सोनकांबळे (ऑक्झिलियम कॉन्व्हेंट), तृतीय- सहीला दीपक कोकणे (अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल), उत्तेजनार्थ- कोमल शिवराम बैरवा (पंडित नेहरू हिंदी विद्यालय), प्रज्ञा संजय भक्कड (अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल) यांनी बक्षिसे पटकावली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सह कार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. पारितोषिक वितरण समारंभाची सूत्रे मनिष कांबळे यांनी सांभाळून निकाल जाहीर केला. आभार संगीता वंगा व अफसर शेख यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.