दोन ते तीन दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
निष्काळजीपणामुळे ठेकेदाराने नळ कनेक्शन तोडल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिनाभरापासून नगर-कल्याण रोड येथील विद्या कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे संकट ओढवलेले असताना परिसरातील महिलांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे व उपायुक्त सचिन बांगर यांची भेट घेवून सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. घरामध्ये पिण्यासाठी पाणी नसल्याने पाणी येत नाही, तो पर्यंत महापालिकेतून जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला होता. अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे यांनी पाण्याचा प्रश्न दोन ते तीन दिवसात मार्गी लावून व खोदून ठेवलेल्या रस्त्याचा प्रश्न देखील तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने महिला परतल्या.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, बाळासाहेब ठुबे, योगिनी निमसे, शालिनी आठरे, मंगल गुंड, सोनाली लोटके, सिमा भंडारी, वंदना गुरप, शोभा पिसे, सारिका भंडारी, वैशाली मोटे आदींसह विद्या कॉलनीतील महिला उपस्थित होत्या.
विद्या कॉलनीत नुकतेच रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी महिनाभरापासून रस्ता खोदण्यात आला आहे. रस्ता एकाबाजूने खोदणे अपेक्षित असताना ठेकेदाराने पूर्णत: रस्त्याच खोदून ठेवला आहे. तर रस्ता खोदला जात असताना ठेकेदाराच्या चूकीमुळे नागरिकांच्या पाण्याच्या पाईपलाइनचे सुमारे दोनशे नळ कनेक्शन तुटले असल्याची तक्रार महिलांनी यावेळी केली. यामुळे नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली. तर रस्ता पूर्णत: खोदल्याने व त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने टँकरने देखील नागरिकांना पाणी पुरविण्यास अडचण निर्माण झाली आहे. ठेकेदार नळाचे कनेक्शन दुरुस्त करत नसल्याने व टँकर येण्यास देखील अडचण निर्माण झाल्याने या परिसरात पाणीबाणीचे संकट उभे ठाकले आहे.
नगरसेवक अनिल शिंदे यांनी ठेकेदाराला सूचना करुन हा प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने परिसरातील महिलांनी आयुक्तांकडे धाव घेऊन पाण्याचा प्रश्न मांडला. तर महिलांनी महापालिकेत पिण्यासाठी पाणी देण्याची आर्त हाक दिली. सोमवार पर्यंत पाण्याचा प्रश्न न सोडविल्यास महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.